पान:वाचन (Vachan).pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथसंग्रहालयांची व्यवस्था राष्ट्राच्या गरजा व साधनसंपत्ती यांना अनुरूप असली पाहिजे. केवळ शहरातच नव्हे तर विशेषतः जेथे पुस्तके अनेकदा मिळत नाहीत, अशा मोठ्या प्रमाणावरील ग्रामीण विभागातील प्रत्येक शाळेत व वसाहतीत निदान एक तरी ग्रंथसंग्रहालय असले पाहिजे. त्या ग्रंथसंग्रहालयातील नोकरवर्ग शिक्षित असला पाहिजे आणि ग्रंथसंग्रहालयास पुस्तकांकरिता पुरेसे अनुदान मिळाले पाहिजे. उच्चशिक्षणाकरिता व तसेच संशोधनांकरिताही ग्रंथसंग्रहालये आवश्यक आहेत. राष्ट्रीय ग्रंथसंग्रहालयांची जाळी निर्माण केल्यास वाचकांना सर्वत्र ग्रंथ साहित्य उपलब्ध होऊ शकेल. ८. संदर्भ साहित्यनिर्मितीमुळे आवश्यक ती माहिती सुरक्षित राहते व उपलब्ध होत असल्यामुळे ग्रंथ लेखनास मदत होते.  शास्त्रीय, तांत्रिक आणि विशेष ग्रंथांकरिता पुरेशा संदर्भ साहित्याची आवश्यकता असते. त्याकरिता, अशा त-हेच्या साधनांची, शासनांच्या आणि ग्रंथांशी निगडित असलेल्या लोकांच्या सर्व घटकांच्या सहकार्याने वाढ केली पाहिजे. माहिती देणारे साहित्य जास्तीत जास्त प्रमाणात सदैव उपलब्ध होण्याकरिता आवश्यक त्या संदर्भ साहित्याचा परदेशातही अत्यंत मुक्त असा प्रसार व्हावा म्हणून प्रोत्साहक योजना हाती घेतल्या पाहिजेत. ९. देशादेशांमधील ग्रंथांचा अनिर्बधित प्रसार हा राष्ट्रांना लागणाऱ्या इतर गोष्टींच्या पुरवठ्याला पूरक आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय सलोख्यास मदत होते. जगाच्या सर्जनशीलतेचा सर्वांना लाभ मिळावा म्हणून ग्रंथांच्या अप्रतिहत प्रसाराची नितांत आवश्यकता आहे. प्रशुल्क आणि कर यांसारखे अडथळे युनेस्कोच्या करारांचा व इतर आंतरराष्ट्रीय शिफारशी व तहनामे यांचा

मोठ्या प्रमाणात स्वीकार करून दूर करता येतात. ग्रंथ व ग्रंथ मुद्रणाकरिता लागणा-या कच्च्या मालाच्या खरेदीकरिता आयात परवाने व परकीय चलन सढळ हाताने दिले पाहिजे आणि अंतर्गत कर व पुस्तक व्यवसायावरील इतर निर्बध शक्य तितके कमी केले पाहिजेत.

वाचन/१२५