पान:वाचन (Vachan).pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५. प्रकाशन व्यवसायाच्या विकासासाठी ग्रंथ निर्मितीच्या साधनांची आवश्यकता आहे.  आर्थिक धोरण ठरविताना शासनांनी ग्रंथ निर्मितीकरिता आवश्यक असलेल्या आधारभूत यंत्रणेच्या विकासाकरिता लागणारे साहित्य व यंत्रसामुग्री उपलब्ध होईल, याची दक्षता घेतली पाहिजे. त्यामध्ये कागद, छपाई व बांधणीची यंत्रसामुग्री यांचा अंतर्भाव होतो. राष्ट्रीय साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून व सवलतीच्या दरात आयात केलेली यंत्रसामुग्री व साहित्य यांच्या आधारे स्वस्त व आकर्षक असे मुद्रित वाङ्मय निर्माण करता येईल. मौखिक भाषांच्या प्रतिलेखनाच्या विकासाकडेही तातडीने लक्ष दिले पाहिजे. ग्रंथ मुद्रकांनी उत्पादन आणि संकलन यांचा दर्जा शक्य तितका उत्कृष्ट ठेवला पाहिजे. अधू लोकांकरिता ग्रंथ निर्माण करण्याकरिता विशेष प्रयत्न केले पाहिजेत. ६. प्रकाशक आणि वाचकवर्ग यांच्यामध्ये दुवा साधण्याचे मूलभूत कार्य ग्रंथ विक्रेते करीत असतात.  समाजामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता आवश्यक असलेल्या प्रयत्नांमध्ये ग्रंथ विक्रेत्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यास अग्रस्थान दिले पाहिजे. वाचकवर्गास विविध तहेची चांगली निवडलेली पुस्तके पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावीत म्हणून ते करीत असलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. पोस्टाचे व विमान वाहतुकीचे सवलतीचे दर, पैसे पाठविण्याकरिता सवलती व इतर आर्थिक प्रोत्साहने यामुळे त्यांना आपले कार्य अधिक सुलभतेने करता येते. ७. ग्रंथसंग्रहालये ही राष्ट्रीय साधनसंपत्ती आहेत. त्यामुळे ज्ञान आणि माहिती यांचा प्रसार होतो आणि सूज्ञता व सौंदर्य यांचा आस्वाद घेता येतो. ग्रंथांच्या वितरणामध्ये ग्रंथसंग्रहालयांचे स्थान मध्यवर्ती आहे. छापील साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याची ती सर्वांत प्रभावी अशी यंत्रणा आहे. एक सार्वजनिक सेवा या नात्याने ग्रंथसंग्रहालये वाचनाचा प्रसार करीत

असल्यामुळे वैयक्तिक कल्याण, आजन्म शिक्षण व सामाजिक आर्थिक प्रगती यांना हातभार लागतो.

वाचन/१२४