पान:वाचन (Vachan).pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेवटी वाचन ही न संपणारी तहान असायला हवी, याबद्दल कुणाचे दुमत असणार नाही. ५. वाचकास काहीही वाचण्याचा हक्क आहे.  जग हे विधिनिषेधयुक्त असते, तसे वाचनही. वाचन उपकारक असते तसे कधी अपायकारकही ठरू शकते; पण म्हणून वाचनाचे वैविध्य कोणास नियंत्रित करता येणार नाही. साहित्यात परिकथा, रूपककथा, हेरकथा, प्रणयकथा, बोधकथा असे वैविध्य असते. भोजन, जसे सर्वरसग्राही तसे वाचनही. वाचन विवेक जन्माला घालते. चांगल्या-वाईटाचा फरक वाचनच निर्माण करते. हा उत्क्रांतीचा नियमच आहे. अनुकूल परिणाम चांगल्याचा होतो. व्यर्थ ते झडते, सार्थक ते टिकते. त्यामुळे ‘पुस्तक बंदी' ही सार्वकालिक निषेधार्ह कृती होय. ६. पुस्तकातील जग वास्तव असा समज/गैरसमज करून घेण्याचा वाचकास हक्क आहे.  साहित्य वास्तव असते तसे काल्पनिकही, शिवाय ते कल्पना नि वास्तवाचे कधी कधी सुंदर मिश्रणही असते. कल्पना, प्रतिभा, सौंदर्य ही सृजन ऊर्जा होय. ती नवे शोध, नवे बोध जन्माला घालते. कल्पना म्हणजे स्वप्नरंजन हा गैरसमज आहे. कल्पना नव्याची जननी. वास्तव म्हणजे केवळ कालभान. दोन्हींची गरज जीवनास असते; पण माणसाच्या प्रत्येक अवस्थेच्या गरजा भिन्न असतात. हे लक्षात घेऊन पुस्तकाद्वारे रमण्याचा, समज/गैरसमज करून घेण्याचा जसा हक्क आहे, तसा तो दूर करण्याचाही आहे. दोन्ही अधिकारांतूनच प्रगल्भता जन्मते. ७. कोठेही, कसेही वाचण्याची वाचकास हक्क आहे.  वाचनाचे मान्य, अमान्य स्थळ नाही. संचार स्वातंत्र्याइतकेच वाचनस्वातंत्र्य स्वैर आहे. वाचनालय, घर, सार्वजनिक, खासगी ठिकाणे, प्रवास, शाळा, वर्ग कुठेही वाचण्याचा वाचकास हक्क आहे. शिवाय बसून, झोपून, रेलून, उभे राहूनही तो वाचू शकतो. वाचन ही स्वेच्छा कृती

म्हणून एकदा का स्वीकारली की ती बंधमुक्त, नियंत्रणमुक्तच राहते. अन्य कृती समांतर वाचण्यास मुभा आहे. टी.व्ही. पाहताना, खेळ पाहताना, जेवताना, शिकताना वाचण्याची मुभा हवी. क्षणभर गैर वाटेल; पण अंतिमतः कोणतेही वाचन, कसेही करून निबंधमुक्त असणे अनिवार्य होय.

वाचन/११८