पान:वाचन (Vachan).pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ते हक्क पुढीलप्रमाणे आहेत. सदर हक्क सकृत्दर्शनी नकारात्मक वाटले तरी त्यात वाचन व्यासंगाचे स्वातंत्र्य मूल्य म्हणून रुजविणारी स्पष्टता दिसून येते. ते दहा हक्क असे - १. प्रत्येकास वाचनाचा हक्क आहे. प्रत्येक व्यक्ती साक्षर व्हायला हवी. त्यासाठी प्रत्येकाने लेखन, वाचनाचे कौशल्य हस्तगत करायला हवे. ज्ञानसंपादन वाचनाशिवाय अशक्य. ज्ञानप्रचार, प्रसारार्थ प्रत्येकाला वाचनाचा हक्क आहे. तो कोणत्याही सबबीवर कोणासही हिरावून घेता येणार नाही. वाचन हे मनोरंजनासाठी जितके आवश्यक असते, तितकेच ते जीवनाचे आकलन होण्यासाठीपण अनिवार्य असते. जीवनातील इप्सित साध्य करण्यासाठी वाचन अपरिहार्य आहे. २. वाचकास कोणताही मजकूर त्याच्या इच्छेनुसार पूर्ण, अपूर्ण, मधील मजकूर गाळून, पाने पलटून वाचण्याचा हक्क आहे. वाचन ही आस्वादक प्रक्रिया आहे. ती आनंददायक कृती होय. ती इच्छेनुसार घडली, तरच वाचनाचा ब्रह्मानंद वाचकासा मिळणार. म्हणून वाचनाची क्रिया वाचकाच्या निवड नि निकड या निकषांवरच व्हायला हवी. ती तशी व्हायची तर वाच्य मजकूर पूर्ण, अपूर्ण अथवा गाळून वाचण्याचा हक्क वाचकास आहे. वाचन ही सक्ती न होता संधी ठरायला हवी. ३. कोणतेही पुस्तक न वाचता तसेच ठेवण्याचा अथवा अर्धवट वाचून सोडण्याची वाचकास हक्क आहे. ग्रंथ म्हणजे ज्ञानसंग्रह. त्याचे वाचकास ओझे वाटता कामा नये. शिवाय ते कोणासही कोणावर लादता येणार नाही. ज्ञानसंपादनाची क्रिया सक्तीने सृजनात्मक होऊ शकत नाही. कोणतीही कृती स्वेच्छा होईल तितकी ती चिरस्थायी होण्याची शक्यता अधिक, शिवाय कंटाळवाणी, न आवडणारी कृती करणे माणसास असह्य असते, हेही यासंदर्भात लक्षात ठेवायला हवे. ४. एखादे पुस्तक वारंवार वाचण्याचा वाचकास हक्क आहे.

गोष्ट आवडणारी असली की, तिची वारंवारिता माणसास आल्हाद देत राहते. वाचन हे रसास्वादन आहे नि ते माणसास आश्वासक, चैतन्यदायी वाटत असेल, ते जीवन समृद्ध करणारे वाटत असेल, तर वाचकास एखादे पुस्तक वारंवार वाचण्याचा, त्याची पारायणे करण्याचा हक्क हवा.

वाचन ११७