पान:वाचन (Vachan).pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परिशिष्ट - १ वाचकांचे हक्क (Reader's Bill of Rights) 1  'पुस्तक दिन', 'वाचक दिन', 'वाचन संस्कृती', 'पुस्तक जत्रा', 'साहित्य संमेलन', 'पुस्तक प्रदर्शन' अशा सर्व उपक्रम, उत्सवांमधून प्रत्येक पिढीत वाचन जिवंत राहावे म्हणून आटोकाट प्रयत्न होत असतात. या सर्वांतून 'वाचाल तर वाचाल' असा संदेश देण्याची धडपड असते. या प्रयत्नाचा भाग म्हणून सुमारे दोन दशकांपूर्वी डॅनिएल पेन्नाक या फ्रेंच लेखकाने १९९२ मध्ये एक पुस्तक लिहिलं. 'दि राइट्स ऑफ द रीडर' त्याचं नाव. 'बाल हुक्क', 'अपंग हक्क', 'महिला हुक्क' असे आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक, सांस्कृतिक जाणिवा विस्तारणारे हक्क जगाने संयुक्त राष्ट्र संघ (युनो) आणि तिच्या युनेस्को, युनिसेफसारख्या संघटनांमार्फत मान्य करून विविध आंतरराष्ट्रीय कायदे, जनमतसंग्रह, करार, जाहीरनामे इत्यादींमधून अमलात आणले, तसे वाचकांच्या हक्कांचापण जाहीरनामा प्रसारित करून त्यास जागतिक मान्यता मिळायला हवी. ही हक्कांची सनद सर्व लोकसभा,राज्यसभा, विद्यापीठे, महाविद्यालये, शाळांच्या ग्रंथालयांत अग्रभागी लावली जावी, तरच वाचक हक्क जपले, जोपासले जाऊन वाचन पिढ़ी-दर-पिढी समृद्ध होत राहील व वाचन संस्कृती टिकेल. वाचकांचे हक्क ही वाचन संस्कृती संकल्पना रुजविणारी जशी आहे, तशीच त्यातून वाचन जाणीव रुंदावण्यासाठी मोठे साहाय्य होणार असल्याने त्यांचा व्यापक प्रचार, प्रसार व्हायला हवा. त्यासाठी ते हक्क माहीत असणे आवश्यक आहे.


१) मेहता मराठी ग्रंथजगत/जून, २०१३/पृ. १२-१५/शंकर सारडा.

वाचन/११६