पान:वाचन (Vachan).pdf/११३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


५.१६ ई-बुक/ई-रिडिंग
  पारंपरिक मुद्रित पुस्तकाची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती म्हणजे ई-बुक होय. हे पुस्तक आपणास व्यक्तिगत संगणक, मोबाईल, किंडलसदृश उपकरण इत्यादींवर वाचता येते. शिवाय पुस्तकांसारखी त्याची पानेही चाळता येतात. पुढे-मागे करता येतात. ही पुस्तके सीडी अथवा सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करून घेऊन ऑनलाइन/ऑफलाइन वाचता येतात. ती पुस्तकांसारखी खरेदी करता येतात. त्यांची अदलाबदल, देवाण-घेवाण शक्य असते. ती संग्रहित करता येतात; तीपण पाच एक मिनिटांत. वाचक मजकूर अधोरेखित करू शकतो. अर्थ, टीप लिहू शकतो. खुणा करू शकतो. त्यातला ठरावीक मजकूर बाजूला घेऊन साठवू, उपयोग करू शकतो. मोबाइलसारख्या उपकरणात अथवा संगणकावर आपण आपल्या फोल्डरमध्ये हवी तितकी पुस्तके, संदर्भग्रंथ,कोश साठवू शकतो. हवे तेव्हा त्यांचा उपयोग करू शकतो. मुद्रित पुस्तकात नसलेल्या कितीतरी गोष्टी ई-बुकमध्ये असतात. त्या म्हणजे लहान टाईप (Font) मोठा करून वाचू शकतो, खुणा बदलू शकतो, फोटो/छायाचित्रे संग्रहित करू शकतो इ.ही मुद्रित पुस्तकांच्या तुलनेने वजनरहितच असतात. किंडलचे वजन २२-२५ औंस किंवा ३-४ पाऊंड इतकेच. सुमारे ५ लाखांपर्यंत पाने आपण साठवू शकतो. त्यास लागणारी जागा नगण्य असते. ई-बुक्स आता मोफतही मिळू लागली आहेत. हे मुद्रित पुस्तकांच्या बाबतीत अशक्यच.

 विकिपीडियावर ई-बुकची व्याख्या करताना म्हटलं आहे, 'An Electric Book (e-book) is a book publication made available in digital form, consisting of text, images or both readable on the flat panel of computer or other computer devices.' यातून ई-बुकचं स्वरूप स्पष्ट होतं. सन २००० पासून ई-बुक वाचणे, खरेदी करणे, वापरणे इ.चा ओघ नि गती वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार ई-पुस्तक वाचक स्त्री-पुरुष सारखे आहेत. तरुण वाचक मोठे असले तरी प्रौढही नोंद घेण्याइतक्या संख्येचे आहेत. ४०% लोकांकडे आता स्वत:चे वाचन साधन (संगणक, मोबाइल्स, किंडल्स इ.) आहे. वृत्तपत्रे, नियतकालिके ई-आवृत्तीत वाचण्याचे प्रमाण रोज वाढते आहे. ई-बुक्स वाचनापैकी ३०% कथा-कादंब-या, १५% इतिहास इत्यादी वाचले जाते. ई-आवृत्तीरूपात इंटरनेट वाचन मुद्रित वाचनापेक्षा गतीने वाढते आहे. बॉबँ ब्राऊन यांनी १९३० मध्ये संशोधून ई-बुक तयार केले.

वाचन ११२