पान:वाचन (Vachan).pdf/१०९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


७. वाचताना अस्पष्ट उच्चार करणे इ.
 वरील दोष लक्षात आले की, सरावाने, प्रयत्नाने सदर दोष दूर करता येतात. प्रत्येक दोष/त्रुटी दूर करायचे उपाय भिन्न असून, आदर्श वाचन काय असते, हे एकदा लक्षात आले की त्रुटी दूर करणे सोपे जाते.
५.१५ वाचन : उगम आणि विकास
 वाचन विकास ही माणसाच्या हजारो वर्षांच्या सामाजीकरण प्रक्रियेतून विकसित झालेली प्रक्रिया आहे. स्थळ नि काळाचा विचार करता वाचन हे सदैव श्रेष्ठच राहत आलेले आहे. वाचन हे व्यक्तीस संस्कृती संपृक्त अनुभव प्रदान करत असते. त्यातून माणसाच्या हाती ज्ञान व माहिती येत असते. ऐतिहासिकदृष्ट्या आपण पाहू लागलो तर असे दिसून येते की, लिखित अथवा मुद्रित सामुग्रीच्या आकलनाच्या अनंत संभावना वाचनाने विकसित केल्या. त्यामुळे व्यक्तीकडून असलेल्या सामाजिक अपेक्षेत भर पडून त्या कालपरत्वे उंचावतच राहिल्या आहेत. सध्याच्या माहिती, तंत्रज्ञान व अंकीय युगात (Digital Era) लिखिताच्या निर्मिती व आकलनाची इतकी साधने, परिमाणे, परी (पद्धती) विस्तारलीत की त्यांनी लिखितातच (Text) उत्क्रांती घडवून आणली आहे.
 वर्ण, शब्द, चिन्हे यांचे सांकेतिक अर्थ उमजण्यास वाचन साहाय्यभूत होत आले आहे. प्रत्येक भाषेतील ज्या मातृका (स्वर, व्यंजन) (Alphabet) असतात, त्या अर्थवाही असल्याने त्यांच्या जोडकामातून, संयोगिकरणातून जे शब्द तयार होतात, त्यांनाही विशिष्ट अर्थ राहत असतो. इंग्रजी जगातील ज्ञानभाषा होण्याचे रहस्य अल्पसंख्य मातृकाधारित लेखन पद्धती आहे, हे फार कमी लोक जाणतात. तिचा सारा प्रपंच २६ मुळाक्षरांचा, इंग्रजी मुद्रणासाठी लागणारा मुद्राकोष (मुद्रित चिन्हे/खिळे) अवघा ८० घरांचा असतो. उलटपक्षी मराठीचा आपण मुद्रित संसार पाहू लागू तर लक्षात येते की, मूळ मराठीत ४८ वर्ण असून, १२ स्वरादी आहेत; पण लेखन पद्धतीचा विचार करता इंग्रजी उच्चारण हे व्यंजन व स्वरांच्या संयोगातून येते, तर मराठीत स्वर हे स्वतंत्र चिन्ह्यांनी (अनुस्वार, काना, मात्रा (एकेरी, दुहेरी), वेलांटी आणि उकार (हस्व, दीर्घ, विसर्ग चिन्ह इ.) मूळ व्यंजनास जोडावे लागते.


१) The Invention of Reading and Evolution of Text. - by Genevieve Marie Johnson

Journal of Literacy and Technology vol 16, No May 2015

वाचन/१०८