पान:वाचन (Vachan).pdf/१०७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


येते ती वाचन व्यवस्थेतून. फळांनी लगडलेलं झाड झुकलेलं तसं वाचलेली माणसं मौन. त्यांचं न बोलणं बोलकं असतं. ते समजायला तुमचं वाचन प्रगल्भ हवं.
 वाचणारी माणसं संघटित होतात नि देश निर्माण करतात. न वाचणारी माणसं युद्धरत राहतात. दुस-या महायुद्धात होरपळलेला जपान युद्धाची भाषा करीत नाही. कारण त्यानं युद्ध वाचलेलं, पाहिलेलं, अनुभवलेलं आहे. वाचन म्हणजे मूल्य व विचार संस्कार, नैतिकता व अनैतिकता यांच्या सीमारेषा समजावतं. वाचन म्हणून मग शकुनी, कर्ण, धृतराष्ट्र, दुर्योधन, शकुंतला, दुष्यंत, कृष्ण, राम यांच्या चारित्र्याच्या सीमारेषा स्पष्ट करतं. हंस नि बदकाचा फरक उमजायचा तर वाचनाचा खोल संस्कार हवाच.
 ‘जीवन त्यांना कळले हो' म्हणत आपण ज्या साध्या समाजधुरिणांचं अनुकरण नि अनुगमन करत असतो, ते त्यांच्या चरित्र वाचनानेच ना? 'चरित्रे त्यांची पाहा जराचा अर्थ आदर्शाचे अनुकरण करा असाच असतो. जग सुंदर व्हायचं तर आदर्श उन्नत हवेत. स्वत:च्या विवेकाच्या कसोटीवर जगणारे सॉक्रेटिस, गॅलिलिओ. जग विरुद्ध असताना प्रतिबद्ध राहतात. कारण त्यांनी सत्य संपादन केलेले असते. 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही। नाही मानियले जनमता।' हे नाकारण्याचं धैर्य येतं वाचनविश्वासातून. थोरो मरणप्राय थंडीत जीव वाचविण्यासाठी कोट आणायला जातो नि पुस्तक घेऊन येतो, हे वाचनवेड नाही तर वाचनाचे महत्त्व अधोरेखित करतं. जगबुडी होत असताना पुस्तकं कवटाळणारा वाचक महाप्रलयातपण वाचण्याची ईष्र्या, आकांक्षा बाळगतो, वाचनाचा एखाद्यास इतका जीवनाधार वाटावा यासारखं पुस्तकांचं महत्त्व दुसरं कोणतं?
५.१२ वाचन वेग

 भाषा हे संपर्काचे प्रभावी साधन होय. या साधनाद्वारे मनुष्य आपले भाव, विचार, कल्पना व्यक्त करत असतो. भाषिक देवाण-घेवाणीतूनच माणूस समाजाशी संपर्क व संवाद साधतो. ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे ही सर्व माणसाची भाषिक कौशल्ये होत. ती कमी-अधिक प्रमाणात सर्वांमध्ये असतात. मनुष्य साक्षर झाला की त्यात वाचन क्षमता येते. तिचा वेग असतो. तो कमी-अधिक असतो. कमी आढळल्यास वाढविता येतो. वाचन वेग मोजता येतो. सर्वसाधारणपणे माणसाचा वाचन वेग दर मिनिटाला १०० ते १५० शब्द असतो, असायला हवा. वेग वाढीमुळे वेळेची बचत होते.

वाचन/१०६