पान:वाचन (Vachan).pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'सुसंगती सदा घडो' हे पुस्तकच करू जाणे. मैत्र जपावं पुस्तकांनीच. पाठराखण करावी पुस्तकांनीच. पहारा द्यावा पुस्तकांनीच. चुकीचं पाऊल पडताना जागं करतं वाचलेलं पुस्तकच. पडत्या काळात (Dark Time) हात देतात वाचलेली पुस्तके नि जोडलेले मित्र! वाचन, लेखन, विचारात स्पष्टता आणतं, मार्गदर्शन करतं. वाचन हे एखाद्या जीवनसत्वासारखं पूरक व सकस असतं. ते तुमच्या वृत्ती नि व्यवहारास सात्विक बनवतं. वाचणारी माणसं व्यसनी होत नाहीत नि व्यभिचारीपण, कारण, पुस्तक वाचन धरण, बंधन होतं.
  कितीतरी पुस्तके भीषण वास्तव चित्रित करतात. मग वाचताना लक्षात येतं की, 'अरे, आपण दु:ख म्हणून सुखच गोंजारत होतो. वाचन तुलनेत तुम्हाला तुमची जागा दाखवत जग समजावतं. म्हणून घेतला वसा टाकू नये' म्हणत निरंतर, अखंड वाचत रहायचं. मोबाईल, टी.व्ही., लॅपटॉप तुमच्या कितीही उपयोगाची साधनं असू देत. ती मिटल्यानंतर चैन, शांतता, स्वास्थ्य, समाधान देऊ शकतं केवळ वाचन. कारण ते काही मागत नाही. ती 'देना बँक' आहे. बाकी सा-या 'लेना बँक. तुरुंग नि घर यामधलं अंतर वाचन समजावतं. मग माणसं कायदा पाळू लागतात. कायदा वाचायचा असतो की पाळायचा, याचं शहाणपण वाचनानेच येतं. माणूस आज वैश्विक झाला म्हणजे काय, तर तो वैश्विक वाचू लागला व वैश्विक विचार, व्यवहार करू लागला. हे वैश्विक भान 'वसुधैव कुटुंबकम्', 'विश्वनिडम्' 'विश्व साहित्य या साच्या कल्पना वाचनाने जन्माला घातल्या. पुस्तक वाचन क्रांतीपेक्षा परिवर्तनावर विश्वास ठेवते, ते त्याचा मूल्यांवर प्रचंड विश्वास आहे म्हणून! कोणत्याही क्षेत्रातील श्रेष्ठत्व संपादन केवळ वाचनामुळेच शक्य असतं. 'विद्वान सर्वत्र पूज्यते' याचं रहस्य त्याचं वाचन श्रेष्ठत्व निर्विवाद असतं. वाचनाशिवाय उच्चता नाही नि अजेयता नाही. 'ज्याने मन जिंकले, त्याने जग जिंकले' खरे! पण मन जिंकणारा जाणकार वाचक असतो. मन जिंकण्याची कला पुस्तके शिकवितात. चकित करणारी प्रतिभा वाचन मंथनातून हाती आलेलं नवनीत ना? सही करता येत नाही. वाचता येत नाहीचा विषाद म्हणजे नाकारलं जाण्याचं शल्य! केवळ सहीनं राष्ट्र स्वतंत्र होणं म्हणजे वाचन वैभवाचा विजय! आज तर जागतिकीकरणाच्या काळात ज्ञान समाज मुक्त झालाय नि

ज्ञानीही! डाऊनलोडचा ओव्हरलोड म्हणजे वाचनाचा नुसता महापूर नाही, महाप्रलय! 'महापुरे जिथे वृक्षे जाती, तिथे लव्हाळे वाचती' हे नम्रतेचं वरदान म्हणजे वाचन शहाणपण होय, ‘उथळ पाण्यास खळखळाट' नि 'संथ वाहते कृष्णामाई' या दोन निसर्गगोष्टी ख-या; पण संयम, सभ्यता, शांती, स्थितप्रज्ञता येते ती वाचन व्यवस्थेतून.

वाचन १०५