पान:वाचन (Vachan).pdf/१०५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आपण आपलं आयुष्य लोळत काढतो, याची जाणीव आळशास करून देते की उद्योगशील माणसाची कष्टकथा. 'रिकामं मन भुताचं घर' होऊ द्यायचं नसेल तर त्यावर पुस्तक वाचनासारखा दुसरा उपाय, उतारा नाही. ज्या कुणाला दुस-याचं जीवन सुखी नि समृद्ध करायचं आहे, त्यानं पुस्तक भेट द्यावीत. एक पुस्तक हजारोंचं जीवन बदलतं ते 'एक होता कार्व्हर'नी दाखवून दिलं आहे. भाषा शिक्षण वाचनाशिवाय अशक्य. गुणवत्ता, यश, ज्ञानसंपादन, प्रावीण्य वाचनाशिवाय कसं शक्य आहे? वाचनाने माणसास दोषांची जाणीव होऊन त्यांचा निरास होतो, तद्वतच गुणांचा गुणाकार केवळ वाचनच घडवून आणू शकतो. वाचनास डोळे उघडण्याचं साधन नि हृदयाची खिडकी का म्हटलं जातं ते समजून घ्यायचं, तर आइन्स्टाइनच्या बरोबरीने सानेगुरुजीही वाचले पाहिजेत. भूत, वर्तमान नि भविष्याची सांधेजोड़ वाचनाशिवाय कशी शक्य आहे? कितीतरी तुरुंगांनी ग्रंथ व वाचन विकासात भर घातली. त्यांचा एकदा इतिहास लिहायला हवा. म्हणजे मग नेल्सन मंडेला, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, पंडित जवाहरलाल नेहरू यांचं वाचनवेड उजेडात येईल. या सर्वांना तुरुंगवास वरदान ठरला तो या तुरुंगवासाने त्यांना वाचन उसंत दिली म्हणूनच.
  एखादा प्रियजन निवर्ततो नि आयुष्य खायला उठतं. अशा दिवसांत दिलासा देते ते केवळ वाचनच. वाचन संकटमोचक खरेच. भावनांचं उदात्तीकरण (Sublimation) करण्याचं साधन म्हणजे वाचन. चहाच्या पहिल्या कपाबरोबर वाचलं जाणारं वर्तमानपत्र त्याची लज्जत वाचकाशिवाय कुणास कळणार? रोज वाचल्याशिवाय झोप लागत नाही म्हणणाच्या माणसाइतका सुजाण, सूज्ञ माणूस दुसरा असूच कसा शकतो? थंडीचे कोवळे ऊन, संततधार पावसात पहुडणं, बर्फाच्छादित घरात अडकणं यांसारख्या वाचनाच्या सुंदर संधी त्या कोणत्या? सुटीचा दिवस वाचनाचा म्हणणारी माणसंच शहाणी ना? वाचन तंद्री असते. ती लागली की वाचन तुम्हाला तदरूप करतं. मग हेर थरकाप घडवून आणतो, वेताळ पिच्छा पुरवितो, परी वेड लावते, शेरलॉक जिज्ञासा निर्माण करतो, सानेगुरुजी रडवितात नि वि. आ. बुवा हसवितात. ही सारी वाचन किमयाच ना?

 सिनेमा, टी.व्ही., रेडिओपेक्षा पुस्तकच बरे ना? ते सतत तुमच्या जवळ राहतं पिच्छा पुरवितं नि तुम्हाला हवं ते करायला भाग पाडतं. पुस्तकासारखा माणसास सक्रिय करणारा, राखणारा दुसरा प्रेरक नाही. पुस्तक वाचून विसरता येत नाही. वाचनाचा भुंगा, त्याचा पिंगा, गुंजारव म्हणजे निरंतर विकास, विधायकतेचा घोष! पुस्तक वाचनासारखी सुसंगती नाही.

वाचन/१०४