पान:वाचन (Vachan).pdf/१०४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 आजच्या काळात मनुष्य एकाच वेळी शाप नि वरदानाचा लपंडाव खेळतो आहे. विज्ञानाने पाणी, वीज, यंत्र यांमधून इतकी साधनं विकसित केली आहेत की, माणसाचं घर हे घर आहे की यंत्रशाळा अशी शंका यावी. प्रत्येक साधन वरदान खरं; पण वाचून सतर्कतेने वापराल, तर वीज प्रकाश देते; पण 'विजेचा प्रवाह तारेतून वाहतो आहे,' वाचता येणारा वाचतो, मुकी जनावरं मात्र विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडतात, तशी अडाणी माणसंही. वाचता येणं म्हणजे संकटापासून सुरक्षित राहणं. लेखन, वाचन ही वर्तमानातली संपर्क साधनं. या काळात वाचता न येणं म्हणजे जिवंत मरण स्वीकारणं होय. 'वाचाल तर वाचाल चा अर्थ काय? समाजाशी जोडून, जुळून राहायचं तर वाचता आलंच पाहिजे. भाषेशिवाय माणूस मुका. 'इथे बोलणा-याची माती विकते, न बोलणा-याचे मोती विकले जाणे दुरापास्त.' अशी भाषाशक्ती वाचनाशिवाय प्राप्त कशी होणार? शब्दाचं सामर्थ्य काय वर्णावं? 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करू' म्हणणारे संत तुकाराम तुम्हाला वाचनास पर्याय नाही हेच शिकवितात. अभंग, गझल, पोवाडे, लावणी सर्व काव्य प्रकार वाचत आपणास शब्दसौंदर्याची जाणीव होते व आपण वाचता वाचता शब्दप्रभू होतो. शब्दसामर्थ्य ही वाचन साधनेची फलश्रुतीच होय. चपखल शब्दप्रयोग हे ग. दि. माडगूळकरांच्या 'गीतरामायण'चे बलस्थान. त्यांनी केलेलं वाचन इतकं अफाट होतं की, गीत रचताना अनेक शब्द त्यांच्यापुढे 'मला घ्या, मला घ्या' म्हणून अर्जवत उभे ठाकत. हे वाचनाच्या ब्रह्मराक्षसी तपश्चर्येशिवाय अशक्य. 'proper thing for proper place' अशी व्यवस्था साहित्य व्यवहारात वाचन साधनेतूनच शक्य होते. वि. स. खांडेकरांची वाक्ये म्हणजे सुभाषितांची शृंखला असते नि अलंकारांचं नर्तन! हा चमत्कार जन्मतो वाचन जिज्ञासेतून व निरंतरतेतून.

 गांजलेल्या माणसांना जगण्याचं बळ देणारी आत्मकथने, अनुभवकथने वाचल्याने कित्येकांच्या आत्महत्या वाचल्या. अनेकांसाठी ती प्रेरणस्रोत बनली. हे असतं वाचन सामर्थ्य. 'Word makes sense of world' या विधानातून हेच तर सूचित होतं. 'वाचाल तर हसाल' म्हणजे काय? वाचा नि सुखी व्हा. मात्र असं वाचन एकाग्र हवं. पलायनवाद, निराशा, उदासी दूर व्हायची, तर हास्यरसपूर्ण कविता वाचावी. पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे यांचं साहित्य म्हणजे दुःस्वास बहिष्कृत करणं नि जीवन आनंदी बनवणं. वाचन माणसाला सकारात्मक बनवतं तसं सक्रियही.

वाचन १०३