पान:वाचन (Vachan).pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हजारो वर्षांच्या सृष्टी, संस्कृती विकासात वाचनाचे जे योगदान आहे त्यामुळेच नव प्रांत, साधन, माध्यम, कला, विज्ञान, संस्कृतीचा शोध लागला आणि वनमानुष्य जगनियंत्रक बनला. जगाचा शोध नि बोध ही केवळ वाचन किमया होय.
  माणसाच्या कल्पना नि तर्क विकासात वाचन हे महत्त्वाची भूमिका बजावते. पूर्वीचे सारे साहित्य कल्पनाप्रचूर असायचे. कवीने चंद्राची सफर करणारी कविता काय लिहिली नि वैज्ञानिकांनी चांद्रयान बनविले. वाचनामुळे माणूस जगाच्या संपर्कात येतो. जग, समाजाशी जोडला जातो. त्याची माहिती होऊन मनुष्य ते अधिक वास्तव, सुंदर नि निर्दोष करण्याचा प्रयत्न करतो.'सत्यं, शिवं, सुंदरम्' म्हणजे दुसरे काय असते? एक माणूस दुस-याचा होण्याची कला नि किमया केवळ वाचनामुळे शक्य होते. 'परकाया प्रवेश (Empathy) ही संकल्पना दुस-याचं जीवन आपलं बनवून त्याला यथाशक्य साहाय्य करण्याचाच प्रयत्न ना? 'Be a change' म्हणजे नुसतं परिवर्तन नाही, तर दुस-याचं कुणी तरी होणं, बनणं असतं. यातूनच समूह भावना जन्माला येते. त्यातून समाज बांधला जातो. समाजातून संस्कृती आकाराला येते. संस्कृती माणसाचं जीवन सुसह्य बनविते; पण त्यासाठी साहित्य, समाज, संस्कृतीसंबंधी पुस्तके, ग्रंथ यांचं नुसतं वाचन नाही तर पारायण व्हायला हवं. पारायण म्हणजे एखादा ग्रंथ साद्यंत वाचणं, वारंवार वाचणं नि त्याचा मतितार्थ जाणून तसा आचारधर्म बनविणं. सत्संग म्हणजे केवळ सहवास, सहनिवास नाही, तर साहचर्याने सद्गुण आत्मसात करणे. गुणावगुण भेदाचं भान वाचन देतं. संस्कृती निरंतर परिवर्तनशील राहते. कारण माणूस बदलत, विकसित होत राहतो. त्याचा आधार असतो वाचनाने येणारी जाण.
 संस्कृतीची मूळे असतात भावनाशील, संवेदनशील माणसांच्या मना-हृदयात. हे भाव माणसात जागविण्याचे कार्य साहित्य करतं. म्हणून सुजाण माणसं 'प्रसंगी अखंडित वाचित जावे चा घोष लावत वाचत राहतात. 'परदुःख शीतल' हे न वाचणा-यांसाठी. संत नरसिंह मेहतांना ती मात्र आपली वाटते. त्याचं कारण त्यांची समाजशील वृत्ती जी काव्य लेखनातून, संत साहित्याच्या अभ्यासातून उदय पावली होती? 'डोळ्यात वाच माझ्या गीत भावनांचे म्हणणारा कवी भाव वाचनाची साक्षरताच रुजवितो ना? लिखितपूर्व काळातपण माणूस वाचायचाच. पुस्तकं नसली तरी देहबोली होतीच. पुस्तकासारखे

भाव, विचार, आचार संक्रमणाचे दुसरे साधन नाही. तुम्ही माणूस होऊ इच्छिताना, मग वाचन अनिवार्यच! हे हृदयीचे ते हृदयी वाचनामुळेच शक्य होते.

वाचन/१०२