Jump to content

पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दीर्घकाळ प्रयत्न कम्युनिस्टांनी केला. यातून मध्यपूर्वेत समाजवाद बलवान झाला नाही. धर्मवादच बलवान झाला आणि कम्युनिस्टांचे बळ व रशियाची शस्त्रसामुग्री अमेरिका विरोधी वातावरण निर्माण करण्यापुरती उपयोगी पडली. बाकी इस्लाम सर्व उदारमतवाद पराभूत करून बळकट होण्याच्या मार्गाला लागला. परंपरावाद्यांशी तडजोडी करून परंपरावाद विरोधी राजकारण बलवान करता येत नसते, असा याचा अर्थ आहे.
वर्ग-वर्ण समन्वय यांपैकी वर्गच घेतला, फक्त आर्थिक राजकारण घेतले तर त्याला जातिव्यवस्थेचा शह बसतो, हे पहिले तथ्य आहे. जर जातीय राजकारण आणि सांस्कृतिक राजकारण याची तळी उचलून धरण्याचा प्रयत्न झाला तर जातीय तणाव वाढतात, समता वाढत नाही, कटुता वाढतात आणि वर्गीय राजकारणाला धोका पोचतो हे दुसरे तथा आहे. डोळ्यांसमोर वर्गीय राजकारण सतत ठेवणे, त्याला उपकारक होईल या बेताने आणि वर्गीय राजकारणाला जातींचा शह बसणार नाही या बेताने वर्ण हाताळणे, हा यावरील मार्ग आहे. सगळी गुंतागुंत असते ती या तिसऱ्या ठिकाणी. म्हणूनच सांस्कृतिक लढयांच्या मागे असणारे आर्थिक आशय हे चिंतनाचे लक्ष्य असावे लागते. प्रांतिक असोत, प्रादेशिक असोत की जातीय असोत, कोणत्याही प्रकारच्या अहंतांच्या बाजूने उभे राहून डोकी फोडीत बसणे हा गरीबांच्या हिताचा रस्ता नाही.

● ●

४०।