Jump to content

पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्थेच्याबाबत आपण फार काही करू शकू असे मला वाटत नाही. सामाजिक नेतेसुद्धा एकेका जातीत वाटले जातात आणि मग या नेत्यांच्या सामर्थ्य मर्यादांचा, त्यांच्या गुण-दोषांचा चिकित्सक अभ्यास अशक्य होऊन जातो. आपल्या जातीच्या नेत्यांविषयी आंधळी श्रद्धा असणारे त्या जातीचे लोक आणि राजकीय सोयीखातर ही श्रद्धा कुरवाळण्याचा प्रयत्न करणारे इतर जातींचे लोक ही बाब वर्ग-वर्ण एकत्रित झगड्याला उपयोगाची नाही.

अवघड निर्णय

वर अनुनय की न्याय, असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. तत्त्व म्हणून सारेजण अनुनय नसावा, न्याय सर्वांना मिळावा हे मान्य करतील, पण व्यवहारात एखादी मागणी न्यायाची आहे की अनुनयाची आहे याचा निर्णय देणे अतिशय कठिण होऊन जाते. शिवसेनेचे आंदोलन यादृष्टीने एक उदाहरण म्हणून लक्षात घेता येईल. आसामात आसामी माणूसच नगण्य आणि उपेक्षित करण्याचा उद्योग प्रांतव्यापी पातळीवर सुरू झाला. याविरुद्ध तिथे जसा क्षोभ आहे तसा क्षोभ मुंबईत महाराष्ट्रीय माणसाची महानगर पातळीवर उपेक्षा सुरू झाली म्हणजे निर्माण होतो आणि मग पाहता पाहता हा क्षोभ सांस्कृतिक आंधळेपणाचे रूप धारण करू लागतो! यातून महाराष्ट्रीयेतरांच्याविषयी विशेषतः दाक्षिणात्यांच्या विषयी क्षोभ ही अराष्ट्रीय प्रवृत्ती एकीकडे आणि लोकशाही विरोध, समाजवाद विरोध ही प्रवृत्ती दुसरीकडे वाढू लागते. महाराष्ट्र, मराठी आणि शिवाजी महाराज यांच्याविषयीचे ममत्व पुढच्या बाजूला, पिछाडीवर कामगारांच्या सर्व चळवळी मुळातून उखडून काढण्याचे भांडवलदारांचे प्रयत्न असा एक उद्योग सुरू होतो तात्कालिक विचार आपण करू लागलो तर धर्म, जाती, संस्कृती, भाषा, प्रांत यांच्या परंपरागत अहंता जनतेच्या पुरोगामी संघटनांचा घात करण्यासाठी प्रभावीपणे वापरता येतात असा या घटनेचा अर्थ आहे. मूळ प्रश्न सोडून कोणत्या तरी मानबिंदूच्या भोवती विध्वंसक आंदोलने

२०।