Jump to content

पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या भूमिकेला व्यवहारात एक महत्त्व आहे. याच्यात सत्यांशही फार मोठा आहे. दलितांच्या संघटना उभारल्याशिवाय आणि लढाऊ संघटन अस्तित्वात आणल्याशिवाय त्यांच्या प्रश्नांकडे लक्षच वेधले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्यांच्याजवळ आहे ते सुखासुखी आपल्याजवळ आहे ते सोडतील ही शक्यता फार कमी असते. म्हणून अडवणूक आणि दडपण याला राजकारणात महत्त्व असते. त्यामुळे एका विशिष्ट पद्धतीने जर एखाद्या नेत्याने संघटन बांधले तर त्याचे त्या त्या कालखंडात महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे.

संघटनांचे स्वरूप

स्वातंत्र्यपूर्व काळात याखेरीज दुसराही एक प्रवाह आढळतो. आपल्या देशात भाषाभेद आणि प्रांतभेद भरपूर आहेत. धर्माचे भेद आहेत, जातींचे भेद आहेत, परंपरागत समाजरचनेत सर्व प्रकारचा विस्कळितप्रणा आणि फुटीरपणा काठोकाठ भरलेला आहेच, त्यावर मात केल्याशिवाय आपल्याला एकात्म राष्ट्र उभारताच येणार नाही. म्हणून राजकीय संघटन सर्व धर्म, सर्व जाती, सर्व भाषा आणि सर्व प्रकारचे भेद गृहीत धरून सर्वसमावेशक असावे, ही संघटना तत्त्वतः असो अगर व्यवहारतः असो, एका जातीची, एका धर्माची अगर एका प्रांताची नसावी. असा संघटनेचा विचार करणारेही अनेकजण होते. याचा प्रातिनिधिक नमुना म्हणून आपण महात्मा गांधींचा विचार केला पाहिजे. कम्युनिस्ट आणि समाजवादी यांचीही धडपड तीच राहिली. आजही आपल्याला प्रत्येक राजकीय पक्षाचा हा प्रयत्न दिसून येतो. या भूमिकेचे महत्त्व नव्याने सांगण्याची गरज नाही पहिल्या भूमिकेचे महत्त्व चटकन दिसत नाही म्हणून त्याची नोंद केली. तर दुसऱ्या भूमिकेची मर्यादा चटकन दिसत नाही, या मर्यादेचीही नोंद केली पाहिजे. व्यवहारात सर्वसमावेशक संघटना कळत नकळत वरिष्ठ वर्गाचे हितसंबंध सांभाळणाऱ्या स्थितिवादी संघटना होऊ शकतात. कुणाचे मन दुखवायचेच नाही ही भाषेतील वृत्ती आणि आपले हितसंबंध सोडायचे नाहीत ही व्यवहारातील

।२९