पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चार वर्णात येत नाही. दलितांच्यापैकी बहुतेकजण वर्णबाह्य पंचमात येतात आणि सर्व छोटे मोठे उद्योगधंदे करणारे म्हणजे सुतार, लोहार, सोनार, बुरुड, कुंभार इ. शूद्रात येतात ! क्षत्रियांच्यामध्ये नेमके कोण येतात हे नक्की नाही. बंजारा समाजासारखा समाज जर घेतला तर त्या समाजाचे मत आपण क्षत्रिय आहोत हे आहे. कायस्थ मंडळी स्वतःला क्षत्रिय मानतात. सर्वत्र क्षत्रिय, वैश्यांचा गट सरमिसळच आहे. ब्राह्मण हा त्या मानाने बराचसा स्पष्ट दिसणारा वर्ण आहे. या देशातील समाजवाद्यांचा लढा ब्राह्मण या वर्णाविरुद्ध असणार नाही, ब्राह्मण ज्या व्यवस्थेचे समर्थक आहेत त्या व्यवस्थेविरुद्ध राहील, असे मी मानतो. बहुतेक समाजवाद्यांचे हेच मत आहे. झगड्याला मुख्य आव्हान म्हणून समोर निरनिराळ्या जाती, जमाती उभ्या आहेत. जातिजमातींच्या राजकारणाचा शह वर्गीय राजकारणाला बसतो. अशा वेळी वर्ण हा शब्द वापरल्याने आपण विचारांना कोणता स्पष्टपणा आणतो आहोत ? दरिद्रयांचे राजकारण आणि कनिष्ठ जातींचे राजकारण या दोन्ही बाबी आपण एकत्र आणल्या पाहिजेत. हा मुद्दा सांगण्यासाठी आपण वर्ग-वर्ण समन्वय असा शब्द वापरतो. आपल्यासमोर तरी निदान ही कल्पना स्पष्ट असायला पाहिजे.

एक संभाव्य धोका

मुसलमानांच्यामध्ये शिया, सुन्नी, अहिमदिया असे जन्माधिष्ठित गट आहेतच, पण पठाण, अरब, इराणी व इतर असेही गट आहेत. धंद्यावरून असणारे विणकर, भंगी, कसाई असेही गट आहेत. आणि हे सारे जन्माधिष्ठित आहेत. ख्रिश्चनांच्यामध्ये कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट या गटांच्या खेरीज पुन्हा जातिव्यवस्था आहे. हिंदूंच्यामध्ये नानाविध जाती आहेत. हा सगळा परंपरागत समाजरचनेचा भाग आहे. या परंपरागत समाजरचनेविषयी उत्कट ममत्व आणि प्रेम हा मनाचा परंपरावाद आहे. समाजाचा परंपरावाद, त्यातून निर्माण झालेला मनाचा परंपरावाद, यामुळे निर्माण होणारी दारिद्रयाविरुद्धच्या लढाईला प्रतिकूल असणारी अवस्था या सर्वांचा विचार

२४।