मध्ये काम करणारा मजूर, कुठेच नोकरी नसणारा, पण छोटा उद्योग सांभाळीत हिंडणारा कनिष्ठ कारागीर, खाजगी व सरकारी क्षेत्रांतील प्यून, कारकून असणारा कनिष्ठ मध्यमवर्ग, औद्योगिक मजूर, नगरपालिकांच्यामधील मजूर हे सगळे वेगवेगळे शहरी दरिद्री वर्गाचे घटक आहेत. प्रत्येकांच्या संघटना निराळया आहेत. प्रत्येकाच्या मागण्या, संरक्षणे निराळी आहेत, या सर्व मजूर संघटना अधिक संरक्षण व पगारवाढ या चक्रात गुरफटलेल्या आहेत. त्यांना समाजक्रांतीविषयी शाब्दिक आस्थेपेक्षा फारशी आस्था नाही आणि ग्रामीण भागात पसरलेला छोटे शेतकरी व शेतमजूर यांचा अत्यंत असुरक्षित, अत्यंत दरिद्री व असंघटित असा एक फार मोठा लोकसमूह आहे, ज्याचे प्रश्न अगदीच निराळे आहेत. या सगळ्यांना आपण 'वर्ग' या शीर्षकाखाली शोषितांचा वर्ग म्हणन उल्लेखितो, अशा एखाद्या स्थूल व्याख्येत ही मंडळी सामावणारी नाहीत. बँकांमध्ये असणारा जो प्यून त्याचा पगार दरमहा पाचशे रुपयांच्या आसपास असतो. आपण जर स्थूलपणे असे गृहीत धरले की वार्षिक सहा हजारांपेक्षा प्राप्तीचे मान कमी असणारे सर्व जण शोषिताच्या वर्गात येतात म्हणून त्यांना एकत्र आणायला पाहिजे, तर आपणास असे आढळून येईल की ज्या वर्षाच्या विरुद्ध आपणाला लढायचे आहे, असे आपण म्हणतो त्या सर्व वरिष्ठ वर्णियांची पन्नास टक्के लोकसंख्या आपण शोषितांच्या वर्गात मित्र म्हणून दाखल करून घेतलेली आहे ! जातिव्यवस्थेमुळे आधीच गुंतागुंतीचे असणारे भारतीय राजकारणाचे चित्र उदारमतवादी भांडवलशाहीमुळे जास्तच गुंतागुंतीचे होऊन गेलेले आहे! वर्ग ही संज्ञा आपण समजतो तशी सुस्पष्ट राहिलेली नाही.
वर्ण ही संज्ञा तर याहीपेक्षा चमत्कारिक आहे. परंपरेने आपण चार वर्ण मानत आलो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे ते चार वर्ण आहेत. अगदी काटेकोर अर्थाने सांगायचे तर अस्पृश्य दलित वर्ग या