पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खोब्रागडे गट असतो. दलित, आदिवासी आणि मुसलमान यांच्यामध्ये डाव्या मंडळींचा, मग ते समाजवादी असोत की कम्युनिस्ट असोत; दोघांचाही संपर्क फार कमी आहे. जोपर्यंत स्वतःचा साक्षात संपर्क दलित, आदिवासी आणि मुसलमान यांच्या समूहात डाव्यांना प्रस्थापित करता येणार नाही तोपर्यंत निवडणुकीच्या राजकारणात अगर सशस्त्र क्रांतीत कुठेच समाजवाद्यांना टिकाव धरता येणार नाही. वर्गवादावर आधारलेल्या राजकारणाला जातीजमातीच्या राजकारणाचा जो प्रचंड शह सर्वत्र बसलेला आहे ती कोंडी फोडण्याचा यत्न करण्यासाठी वर्ग-वर्ण समन्वयाची भूमिका आग्रहाने मांडली जात आहे.

एक चिंतनीय वास्तवता

इतिहास-पुराण आणि मार्क्स-लेनिनचे ग्रंथ यांचे आधार व अवतरणे या आधारे मुख्य मुद्दा मांडायचा कोणता? मुद्दा असा आहे की, या देशात उद्योगपती आणि भांडवलदार यांच्याशी सधन शेतकरी, बागायतदार व जमीनदार यांची युती झालेली आहे. ही सगळी 'आहे रे' किंवा सधन या वर्गाची युती आहे. याच्या विरुद्ध सर्व औद्योगिक मजूर, इतर सर्व प्रकारचे मजूर, सर्व कनिष्ठ शासकीय नोकरवर्ग, सर्व कनिष्ठ खाजगी क्षेत्रातील नोकरदार आणि शेतमजूर, कोरडवाहू छोटे गरीब शेतकरी या सर्वांची युती उभारायला पाहिजे. म्हणजे सर्व 'नाही रे' आणि दरिद्री वर्ग सर्व सधनांच्या विरुद्ध उभा करायला पाहिजे. आकडेवारीत आणि टक्केवारीत बोलायचे तर दोन टक्क्यांच्या विरुद्ध आठठ्याण्णव टक्के लोक उभे करायला पाहिजेत. ही क्रिया संपूर्ण यशस्वी होण्याची गरज नाही. साठ टक्के लोक जर एकत्र गोळा करता आले तर निवडणुका शंभर टक्के जिंकता येतील आणि हे घडू द्यायचे नाही म्हणून निवडणुकाच गुंडाळण्यात आल्या तर सत्ताही उलटून टाकता येते. पण हे घडत नाही कारण या आर्थिक राजकारणाला जातींचा शह बसलेला आहे.

आपण वर्ग आणि वर्ण असे शब्द वापरतो. हे दोन्हीही शब्द पुरेसे संदिग्ध आहेत याचे भान आपण ठेवायला हवे. शहरांत हॉटेल

२२।