फक्त सामाजिक, फक्त राजकीय असा विचार करणारी मंडळी आपल्या राजकारणात होती, त्याप्रमाणे फक्त आर्थिक्-प्रश्नांचा विचार करणारीही मंडळी आपल्या राजकारणात होती. स्थूलमानाने सांगायचे तर फक्त आर्थिक प्रश्नांचा विचार करणाऱ्या मंडळींचे म्हणणे दोन गटांत विभागता येईल. एक गट असे मानणारा की, क्रांतीचा नेता औद्योगिक मजूर आहे. सर्व देशभरचा औद्योगिक मजूर जर आर्थिक प्रश्नांच्यावर जागृत आणि संघटित करता आला तर या संघटनेच्या जोरावर आपण क्रांती करू शकू, शासन सत्ता उलथून टाकू शकू आणि सत्ता आपल्या हातात घेऊ शकू. हे कार्य करताना शेतमजूर आणि त्यांच्या संघटना उपयोगी आणि साह्यकारी ठरतील. कनिष्ठ मध्यम वर्ग उपयोगी आणि साह्यकारी ठरेल. हे संघटन आर्थिक प्रश्नांवर उभारता येईल. यामुळे उरलेल्या सर्व प्रश्नांच्याकडे दुर्लक्ष करून केवळ आर्थिक प्रश्नांच्यावर लक्ष केंद्रित करून आपण क्रांती करू शकू आणि ही क्रांती झाल्यावर आवश्यक ते राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनही आर्थिक परिवर्तनाच्या आधारे घडवून आणू शकू. कम्युनिस्टांच्यामध्ये एक गट या भूमिकेचा होता. शहर हे त्यांचे कार्यक्षेत्र, खेड्यांचा विचार ते अनुषंगाने करीत.
दुसरा गट यापेक्षा निराळ्या पद्धतीने विचार करणारा होता. त्यांच्यामते सशस्त्र क्रांतीसाठी अवाढव्य देशात आणि पुरेसे औद्योगीकरण न झालेल्या देशात औद्योगिक मजूर हा आधार अगदीच दुबळा ठरतो. म्हणन क्रांतीचा आधार शहर नसून खेडे समजायचा. खेड्यांच्या शक्तीच्या जोरावर शहरे घेरली जातील, ही माओची प्रसिद्ध भूमिका आहे. शेतमजूर, छोटा शेतकरी, छोटा शेतमालक, कनिष्ठ मध्यमवर्ग आणि गिरणी कामगार सारेच संघटित करायचे, पण क्रांतीचा मुख्य आधार खेडी आणि शेतमजूर समजायचा. त्यांच्या ताकदीवर सत्ता ताब्यात घ्यायची आणि मग सर्व परिवर्तन करायचे. याही भूमिकेत संघटनेचा आधार आर्थिक प्रश्न हाच होता. कम्युनिस्टांच्यामध्ये एक गट या भूमिकेचा होता.
सोव्हिएट रशियात कॉम्रेड लेनिन यांनी संघटना कशी उभारली