पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वेगळ्या भाषेत सांगायचे तर इतरांचे आर्थिक शोषण करण्याचा काही जणांचा हक्क त्याला समर्थनीय व रक्षणीय वाटतो. मार्क्सचे तसे नाही. तो समता आणि न्यायाचा पुरस्कर्ता आहे. जीवन फक्त अर्थमूलक मानणे पुरेसे नाही, त्याशिवाय न्याय आणि समतेचीही कल्पना मानावी लागते. न्याय आणि समता या कल्पना आर्थिक नसून नैतिक व सामाजिक आहेत. म्हणूनच मी समाजवाद ही कल्पना नुसती आर्थिक समजत नाही, ती नैतिकही मानतो.

वेदान्त व मार्क्सवाद

जीवन अर्थमूलक आहे, या तरी म्हणण्याचा खरा अर्थ काय ? या म्हणण्याचा खरा अर्थ असा आहे की, आर्थिक प्रश्नच सामाजिक प्रश्नाचे रूप धारण करतात, राजकीय प्रश्नांचे रूप धारण करतात. जे प्रश्न आपण राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी नावांनी ओळखतो ते सगळे प्रश्न मूलतः आर्थिक असतात आणि आर्थिक असतात म्हणजे नुसते पैशांचे नसतात तर हितसंबंधांचे असतात. उत्पादनाच्या साधनांवर ताबा असण्याचे असतात. या उत्पादन व्यवस्थेशी संबंध असण्याचे असतात. अर्थव्यवस्थेखेरीज जीवनात दुसरे काहीच खरे नाही, हा वेगळ्या भाषेत मांडलेला अद्वैत वेदान्त आहे ! अद्वैत वेदान्ताचे उपासक ब्रह्माखेरीज इतर सर्व काही मिथ्या असून ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे असे सांगतात. हे एकमेव सत्य ब्रह्म नसून अर्थ आहे. बाकीचे सगळे मिथ्या आहे. आणि हा अर्थ स्वयंगती असून सर्व चेतनेचा आधार आहे, ही भूमिका वेदान्ताची आहे, मार्क्सवादाची नाही. जीवनातील सर्वच प्रश्नांना आपापल्या मर्यादेत सत्यता असते. म्हणून सामाजिक, राजकीय, धार्मिक प्रश्न ही सत्य आहेत, व्यक्तींच्या सुख दुःख,आशाआकांक्षा व अहंता यांनाही सत्यता आहे. मात्र या सर्वांच्या मागे मुळात आर्थिक प्रश्न उभे आहेत, अशी मार्क्सची भूमिका आहे. या भूमिकेत अर्थ ही कल्पना 'पैसा' यापेक्षा किती तरी व्यापक आहे.

फक्त आर्थिक प्रश्नांचा विचार करणे ही काही जणांची पद्धत असते.

१६