Jump to content

पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लढयात रस नव्हता, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांविषयी ज्यांना महत्त्वही नाही आणि आदरही नाही त्या मंडळींचे सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांविषयीचे आग्रह मला प्रामाणिक वाटत नाहीत. कारण राजकीय स्वातंत्र्य जर नसेल तर आपण सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवूनच आणू शकत नाही.

नैतिक व सामाजिक कल्पना

काही मंडळी अशी असतात की ज्यांनी जीवनातील मूलभूत प्रश्न आर्थिक असतात या भूमिकेचा अर्थ चुकीचा लावलेला असतो. मी स्वतः असे मानतो की, समूह जीवनातील प्रश्नांचा मूलभूत गाभा आर्थिक असतो, पण ही भूमिका सांगणारा पहिला माणूस कार्ल मार्क्स नाही, कौटिल्याचे मत समाजजीवन अर्थमूलक आहे हेच होते! धर्म आणि काम यांचे मूळ अर्थ आहे, असे कौटिल्याचे सूत्र आहे. कौटिल्य जीवनाचे अर्थमूलकत्त्व सांगतो. कामशास्त्रज्ञ वात्सायनसुद्धा समूहजीवन अर्थमूलक आहे असेच मानतो, पण अर्थमूलकत्व कौटिल्य आणि वात्सायनाने जरी नोंदवलेले असले तरी मी स्वतःला कौटिल्य आणि वात्सायनाचा अनुयायी मानणार नाही. मी स्वत:ला मार्क्सचाच अनुयायी मानतो. कारण जीवन अर्थमूलक आहे इतकेच मानल्याने प्रश्न संपत नाही. जीवन अर्थ मूलक आहे, हे मानल्याच्या नंतर समाजात जी संपत्ती आहे ती समाजाच्या श्रमातून जन्माला येते म्हणून तिच्यावर समाजाचा हक्क असला पाहिजे, हेही मानावे लागते. आर्थिक प्रश्न मूलभूत असल्यामुळे समाजातील एकूण एक माणसाच्या किमान गरजांची पूर्तता होईल ही हमी समाजरचनेने दिली पाहिजे, असेही मानावे लागते. अर्थ ही सत्ता असल्यामुळे एका मर्यादेपलिकडे कुणाला संपत्ती मिळणार नाही, मर्यादेपलिकडे संपत्ती कुणाच्या मालकीची असणार नाही आणि कुणालाही किमान गरजांच्यापेक्षा कमी प्राप्ती होणार नाही असेही मानावे लागते. मार्क्समध्येच या सर्व कल्पना आहेत, कौटिल्य-वात्सायनात नाहीत. म्हणून जीवन अर्थ मूलक मानले तरी कौटिल्य विषमता आणि शोषण स्वाभाविक मानतो. रक्षणीय मानतो.

१५