मुस्लिम समाज भारतीय राष्ट्रवादात आत्मसात करता येईल. दुसरी भूमिका अशी होती की, मुस्लिम समाजातील मध्ययुगीन मनोवृत्तीच्या जमीनदारांना सर्वसामान्य जनतेचे कल्याणच नको आहे. म्हणून काँग्रेसच्या पुरोगामी भूमिकेची त्यांना भीती वाटते. मुसलमानांचे धार्मिक राजकारण म्हणजे मुस्लिम जमीनदार आणि वतनदार यांनी ब्रिटिशांच्या साहाय्याने आरंभलेला एक उद्योग आहे. गोरगरीब मुस्लिम जनतेला जागृत करणे आणि मतदानाचा हक्क त्यांच्यापर्यंत नेणे या मार्गाने आपण लढू शकू. दरिद्री मुस्लिम समाज हा मुस्लिम धार्मिक राजकारणाच्या विरुद्ध लढण्याचे फार मोठे हत्यार ठरणार आहे. अशा वेगवेगळ्या भूमिका स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय राजकारणात होत्या. हिंदू आणि मुस्लिम यांच्यांतील मतभेदांचा फायदा इंग्रज उठवतात, तेव्हा हिंदू-मुसलमानांना वाटेल ती किंमत देऊन एकत्र आणले पाहिजे आणि दुही माजवणारा हा तिसरा पक्ष म्हणजे इंग्रज यांना हाकून दिले पाहिजे, असेही काही जण समजत. या सर्वाचा एक परिणाम सरळ होता: मुस्लिम धार्मिक आणि परंपरावादी राजकारणाविषयी बोलायचेच नाही ही स्वातंत्र्यपूर्व काळातील पद्धत होती. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस ही हिंदूंची संघटना असून तिचा गाभा हिंदू राज्य निर्माण करणे व मुसलमानांना गुलाम करणे हा आहे, नेहरूंच्यामध्ये आम्हाला एक उद्धट ब्राह्मण दिसतो, गांधी हा पक्का हिंदुत्ववादी आहे, असल्या प्रकारच्या घोषणा व चर्चा मुस्लिम लीग करत असे! महंमदअली जीना, लियाकतअली खान आणि हैद्राबाद संस्थानात कासिम रझवी यांचे हे कायमचे मुद्दे होते. आजही भारतीय मुस्लिम लीगचा हा कायमचा मुद्दा आहे. बनातवालांच्या भाषणात हा आपणास ऐकायला सापडतो.
स्वातंत्र्योतर काळात पाकिस्तान वेगळे झाले आणि जो उरलेला भारत शिल्लक राहिला त्यात अल्पसंख्यांकांचे हितरक्षण हा काँग्रेसचा नेहमी मुद्दा राहिला. जुन्या काळी म्हणजे स्वातंत्र्यपूर्वकाळी इंग्रजांच्याविरुद्ध