पान:वनस्पतिविचार.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७ वे ].     पेशी (Cell) सजीवतत्त्व (Protoplasm) व केंद्र (Nucleus).     ५१
-----

सही त्या पेशी निरुपयोगी होतात, व हळुहळू गळू लागतात. जुन्या पेशींतून प्रथम प्रथम रस जात येत असतो खरा, पण अगदी जुन्या पेशी मृत असल्यामुळे त्या गळून जरी पडल्या तरी वनस्पतीच्या संसारयात्रेत कोणताही फरक पडत नाहीं. मोठमोठ्या वृक्षाच्या ढोलीत सर्व पेशीसंघ मृत असतो, तरी बाहेरील बाजू सजीव असूनही रोजचे व्यवहार चालू असतात.

 रंजित शरीरे:-( Chloroplasts ) सजीवतत्त्वामध्ये विशिष्ट कार्य घडून त्यापासून रंजित शरीरे तयार होतात. ह्या शरीरांकडून विशिष्ट काय घडत असल्यामुळे वनस्पतीच्या जीवनयात्रेत ह्यांची उपयुक्तता फारच महत्त्वाची असते. पेशीतील केंद्र ज्या सजीव तत्त्वांचे बनले असते, तशाच प्रकारचे तत्त्व असल्या शरीरांत आढळते. सजीवतत्त्वापासून हरिद्वर्ण पदार्थ ( Chlorophyll ) उत्पन्न होऊन त्यासभोंवतीं सजीव कण जमतात, व पुढे त्यापासून हरिद्वर्ण शरीर ( Chloroplast ) उत्पन्न होते. अशा प्रकारची पांढरी अथवा इतर रंजित शरीरें वनस्पति पेशींत आढळतात. सूर्यप्रकाशांत पांढऱ्या अगर इतर रंगाच्या शरीरांपासून अंधारांत फिकट रंगाची शरीरें उत्पन्न होतात. ह्मणजे शरीराचे रंग बदलण्यास प्रकाश पुष्कळ अशी कारणीभूत होतो यांत संशय नाहीं. उन्हाळ्यांत कोवळ्या पानांत तांबूस रंगाची शरीरे असून पुढे ती हरितवर्णी शरीरें बनतात. ह्याचे कारण केवळ प्रकाश आहे. जितका हरिद्वर्ण पदार्थ पानामध्ये अथवा वनस्पति शरीरांत अधिक असतो, तितक्या प्रमाणांत तो वनस्पतीस जास्त उपयोगी पडतो. ह्मणूनच ज्या वनस्पतीमध्ये पुष्कळ सतेज हिरवी पाने असतील ती वनस्पति आरोग्यदृष्ट्या उत्तम आहे, असे समजण्यांत येते. तसेच उलटपक्षी ज्या वनस्पतीमध्ये अस्सल हरित वर्णाचे ऐवजी फिकट रंग आढळतो, त्या वनस्पतीचे आरोग्य क्षयरोग्याप्रमाणे रोग लागून बिघडले आहे, असे समजावे. लवकर उपाय जर न होतील तर ती वनस्पति मृत होईल. फुलांच्या पाकळ्यांत तांबडा, पिवळा, गुलाबी वगैरे रंग आढळतात, हे रंग त्या रंजित् शरीरांपासून अलग करितां येतात, आलकोहलमध्ये हिरवी पानें ठेविली असतां पानांतील हरित वर्ण पदार्थ ( chlorophyll ) अलग होऊन आलकोहलचे बुडाशी जमतो. तसँच बाष्पीभवन करून शुद्ध केलेल्या पाण्यांत पाकळ्या ठेविल्यावर त्यांचा रंग सुटून अलग होतो.