पान:वनस्पतिविचार.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७ वे ].     पेशी (Cell) सजीवतत्त्व (Protoplasm) व केंद्र (Nucleus).     ४९
-----

असून प्रत्येक सूक्ष्म कणासभोंवती पाण्याचा थेंब असतो. स्ट्रासबरगर साहेब म्हणतो की, पेशीभित्तिकेची घटकद्रव्ये जाळ्यासारखी जणू एकमेकांत गुंतली असून मधल्या सुट्या जागेत पाण्याचे थेंब अगर कण राहतात. अलिकडील शोधांत असे ठरत आहे की, भित्तिकेचे घटकावयव सजीव कणांनी वेष्टित असून त्यांत पाण्याचा अंतर्भाव होतो. नवीन शोधाप्रमाणे भित्तिका सुरवातीस सजीव असून पुढे त्यांतील सजीव तत्व हळूहळू नाहींसें होते, व त्याबरोबर भित्तिकाही मृत होते. अशा वेळेस भित्तिकेस कायमचे स्वरूप प्राप्त होते,

 भित्तिकेच्या घटक द्रव्यांत व सत्वा ( Starch ) च्या घटक द्रव्यांत फारसा फरक नसतो. सत्त्वाच्या घटक द्रव्यापेक्षां पहिल्या द्रव्यावर अधिक कार्य घडून त्यांच्या शक्तीत थोडा फरक होतो. आयडीनचा थेंब सत्त्वाचे कणावर टाकिला असतां कणास निळा रंग येतो, पण तोच थेंब पेशीघटकावयवावर पाडला असता त्यास निळा रंग येत नाही. निळा रंग त्यास आणावयाचा असेल तर प्रथम गंधकाम्ल त्यावर सोडून नंतर काही वेळाने आयडीनचा थेंब सोडावा, म्हणजे तात्काल पेशीभित्तिकेस निळा रंग येईल. बाकी घटक प्रमाण दोन्हीचे सारखेच असते.

 सजीव तत्त्वाच्या चैतन्यशक्तीमुळे भित्तिका वाढू लागते ही गोष्ट खरी, तथापि ती सर्व बाजूस सारखी वाढते असे नाहीं. पेशीची वाढ अंतरघडामोडीमुळे कमी अधिक होते. तसेच बाह्य परिस्थितीचा परिणाम पेशीच्या आकारावर होतो. चौकोनी, वाटोळे, किरणाकृति, त्रिकोनी, चौकोनी वगैरे आकार पेशीमध्ये आढळतात. पेशींची वाढ सुरू झाल्यावर सजीव तत्व आंतून बाह्यांगाकडे निरनिराळ्या प्रमाणांत कणांचे थरावरथर पाठवत राहिल्याने आंतील जाडी कमी अधिक मोठी होते. तसेच ज्या आकारांत ते कण जमत जातात, त्या प्रकारचा आकार पेशीच्या आतील बाजूस तयार होईल. या रीतीने फिरकीदार ( Spiral) वळ्यासारखे (Annular) वगैरे आकार उत्पन्न होतात. कधी कधी जागजागीं मोठे थर जमून मध्यभागी खांचा राहतात. असल्या पेशीस खांचेदार (Pitted) म्हणतात. असल्या कमी अधिक जाडीच्या निरनिराळ्या आकाराच्या पेशीपासून ज्या वाहिन्या (Vessels ) तयार होतात त्यास तोच आकार येतो, हे निराळे सांगावयास नको. सुरूच्या लाकडांत खांचेदार पेशी व वाहिन्या पुष्कळ असतात.