पान:वनस्पतिविचार.pdf/75

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७ वे ].     पेशी (Cell) सजीवतत्त्व (Protoplasm) व केंद्र (Nucleus).     ४७
-----
प्रकरण ७ वें.
---------------
पेशी (Cell) सजीवतत्त्व (Protoplasm) व केंद्र (Nucleus).
---------------

 पेशी–ताज्या ताडीचा एक थेंब सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये पाहिला असतां त्यामध्ये पुष्कळ लहान लहान वर्तुलाकृति पदार्थ आहेत असे आढळेल. प्रत्येक लहान वर्तुळ म्हणजे एक स्वतंत्र पेशी होय. पूर्वी वर्णन केलेली किण्व (Yeast) नांवाची वनस्पती हीच होय. प्रत्येक वर्तुळांत वर्तुळाचा बाह्य पडदा, केंद्र व केंद्रासभोवती जीवनकण हीं स्पष्ट दिसतात. वर्तुळांत दोन प्रकारचे पदार्थ आढळतात. सचेतन व जड ( Living and dead ). सजीव तत्त्व (Protoplasm) किंवा त्याचे सुटे कण तसेच तेथील केंद्र (nucleus) हे सचेतन पदार्थ आहेत.

 वर्तुळाचा बाह्य पडदा व आंतील द्रवादि पदार्थ हे मात्र जड ( dead ) आहेत. जमिनीतील निरिंद्रिय द्रव्ये जशीच्यातशी पेशीमध्ये येऊ शकत नाहींत. ती द्रव्ये प्रथम पाण्यात विरघळतात; नंतर ते पाणी जेव्हा पेशीमध्ये शोषिले जाते, त्याबरोबर ती विरघळलेली द्रव्ये आत शिरतात. जसे जसे जास्त पाणी पेशीमध्ये शिरते, तशी तशी ती पेशी जास्त फुगू लागते. प्रथम कांहीं वेळ ते पाणी जीवनरसामध्ये मिसळून जीवन रस पातळ होऊ लागतो; पण ही स्थिति फार वेळ टिकणे शक्य नसते. पाणी जास्त झाल्यामुळे तसेच जीवन रस अधिकाधिक पातळ झाल्यामुळे, ते पाणी पेशींत विशिष्ट जागी सांठविले जाते. त्या विशिष्ट जागेस जडस्थानें । Vacuoles ) म्हणतात. जडस्थानामध्ये निरिंद्रियद्रव्य मिश्रित शोषिलेले पाणी जमून सजीव तत्त्व बाह्यांगाकडे जाते. ह्या पाण्यास पेशीरस ( Cell Sap) म्हणतात.

 पेशीस बाह्य पडदा असणे अवश्य नसते. कांहीं पेशीमध्ये नुसतें जरूर तेवढे सजीव तत्त्व असून बाह्य पडदा नसतो. पण पुढे ते तत्त्व आपलें घटकदुव्यांतून बाह्य पडदा अगर पेशी-भीत्तिका (Cell wall ) उत्पन्न करते. पेशी कशी असते याविषयी चांगली कल्पना येण्याकरिता आपण मधमाशीच्या पोळ्याचे व नारिंगाचे उदाहरण घेऊ, मधमाशीची प्रत्येक कोठडी दुसऱ्या