पान:वनस्पतिविचार.pdf/73

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


६ वे ].     पर्ण Leaf.     ४५
-----

करतात. पण झुपक्यामध्ये सुद्धा एकमेकांच्या छायेखालीं न सांपडतील व सर्वांस सूर्यप्रकाश सारखा मिळेल, अशी तजवीज असते. ह्यामुळे प्रत्येक झाडावरील पानांच्या मांडणीत त्यांच्या परिस्थितीप्रमाणे फरक आढळतो.

 मांडणीचे मुख्य प्रकार:-१. एक झाल्यावर एक. (Alternate ) २. समोरा समोर. (Opposite) ३. वर्तुळाकृती (Whorled). आंबा, तीळ, गुलाब, वगैरेमध्यें पाने एक झाल्यावर एक येतात. प्रथम एक पान एका बाजूस येऊन त्याचे दुसरे बाजूस दुसरें पान येते. मका, बाजरी, वेळू, लोकॅॅट वगैरे उदाहरणे ह्या प्रकारची आहेत. ।

 हीं पाने काल्पनिक मळसूत्राकृतीमध्ये येऊन केव्हाही दोन पाने खाली अगर वर एकमेकांच्या डोक्यावर येतात. उदाहरणार्थ आपण निंबाची पाने तपासू. हीं पाने मळसूत्राकृतींमध्ये आली असून एका विशिष्ट पानापासून वर मोजीत गेले असता सहावे पान बरोबर त्याचे डोक्यावर येते. ते विशिष्ट पान सोडून पुढे तपासलं तर कोणतेही पहिलें व सहावें पान परस्पर एकमेकांच्या खाली व वर सरळ लंब रेषेत येते, व त्यामध्ये दोन काल्पनिक मळसूत्राकृती वर्तुळे पुरी होतात. अशा रीतीने त्या दोन पानांचे अंतर वर्तुळाच्या अंशांत दाखविता येते. पुष्कळ द्विदलधान्य वनस्पतिमध्ये ह्या प्रकारची मांडणी आढळते, अशोक झाडांत तिसरे पान, मुळपानांवर लंब रेषेत येते. नास्पाती, सफरचंद वगैरेमध्ये पांचवें पान मूळ पानांवर येते. कित्येक ठिकाणी आठवें व कित्येक ठिकाणी तेरावें पान मूळ पान सोडून लंब रेषेत येते.

  रुई, मांदार, तुळशी वगैरेमध्यें पाने समोरा समोर येतात. मांदाराची पानें सुद्धा मळसूत्राकृतीमध्ये रचलेली आढळतात. म्हणजे पानाची जोडी एक सोडून एक अशी एकमेकांच्या डोक्यावर येते. येथे एका पानाचे ऐवजी पानांची जोडी मळसूत्राकृतींत रचिली असते, एवढाच काय तो फरक.

 कण्हेर, रसूलिया, छतावर, हमेलिया वगैरेमध्यें पाने एका सांध्यापाशी पुष्कळ आल्यामुळे वर्तुळाकृतींत होतात. एका सांध्यापाशी एकच पान आलें असते तर एक झाल्यावर एक अशी पाने आली असती, पण पुष्कळ पाने एका ठिकाणी येतात म्हणूनच वर्तुलाकृती मांडणी असा भेद केला आहे.