पान:वनस्पतिविचार.pdf/68

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

रुंदीचे असते. पिंपळ, तुती वगैरेमध्ये पाने बुडाशी रुंद असून शेंड्याकडे निमूळत असतात. फणसामध्ये पानांस चमच्यासारखा आकार असतो. उतरण, गुळवेल, समुद्रशोक, भोंपळा वगैरेची पाने पत्त्यांतील लालबदामाच्या आकाराची असतात. आंबोशीमध्ये तीन पत्रे असून प्रत्येक पत्राचा उलट्या लालबदामाप्रमाणे आकार असतो. म्हणजे टोंकाकडे खोलगट असून बुडाकडे निमूळते पत्र असते. चांदव्याची पाने अर्धचंद्राकति असतात. बनवारीची पाने बाण लावून सज्ज केलेल्या तिरकमट्याप्रमाणे दिसतात. ब्रम्हीमध्यें पाने मूत्रपिंडाकृति असतात. सिरस, मुळे वगैरेमध्ये पाने विणाकृति असतात. विण्याचा मोठा भाग शेंड्याकडे असून खाली विण्यावरील खुट्यांवजा लहान पत्रे असतात. कृष्णकमळ एरंडी वगैरेची पानें हस्तसदृश असतात असे पूर्वी आलेच आहे. अशा प्रकारे पानांचे आकार नानातऱ्हेचे असतात.

 कडा-( Margin) फणस, रुई, मांदार, तुळस, वगैरेमध्ये पानांच्या कडा सारख्या असतात. कित्येक पानांत कडा करवतीच्या दात्याप्रमाणे अणकुचीदार असतात. जसे केवडा, अकॅलिफा, वगैरे. घायपातीच्या पानांत करवतीप्रमाणे कडा असून दाते उलटे व सुलटे असतात. मुद्रा, अजेरटम वगैरेमध्ये पानांच्या कड्यावर वांटोळे दाते असतात. हे दाते बोचण्याची भीत नसते. पाथरीच्या कडा पाण्याच्या लाटेप्रमाणे आंत बाहेर आलेल्या असतात. पिवळा धोत्रा, हॉली वगैरेमध्ये कडा कांटेरी असतात.

 अग्र-( Apex) पत्रांची अग्रे वेगवेगळी असतात. मोहरीत पानाची अग्रे वांटोळी असतात. देवनळ, वेळू, ऊस, आंबा वगैरेमध्ये ती अणकुचिदार असतात. तुती, ऱ्हिया, पिंपळ, वगैरेमध्यें अग्रे हळूहळू निमूळती होत जातात. कांचन, कचनार, आपटा, त्रिधारी निवडुंग वगैरेमध्ये अग्रावर खोलगटा असतो. घायपात, रुलिया, केवडा वगैरेमध्ये शेंडा दाभणासारखा बोंचक कठीण असतो. तीळ, भुयमूग वगैरेमध्ये पत्रे शेंड्याकडे वाटोळी असून त्यावर मध्यभागी थोडासा उंचवटा असतो.

 पृष्ठभागः-काहीं पानांचे पृष्ठभाग खरखरीत व कांहींचे मऊ असतात. भोपळा, फाळसा, सागवान, ऊस वगैरेमध्ये पाने खरखरीत असतात. कर्दळ, केळी, गुलछबू, नागवेल वगैरेमध्यें पाने मऊ गुळगुळीत असतात. वेत, जंगली-