पान:वनस्पतिविचार.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

देंठाची वाढ जास्त होऊन वर वाढणारी पत्रे अगदी नामशेष होतात. अशा ठिकाणीं पत्राची कामें देठास करावी लागतात. कांहीं मांसाहारी वनस्पतींमध्ये पानांचा देंठ सुरईसारखा मोठा वाढतो, पण मुख्य पान अगर पत्र फारसे वाढत नाहीं. सुरईच्या तोंडावर एक झांकणही असते. असल्या वनस्पतीचे भक्ष्य किडा, मुंगी अथवा फुलपाखरू असते. ते चुकून सुरईत गेले असतां तेथे असणाऱ्या रसांत गुटमळून मरण पावते, व पुढे त्या रसांत ते विरघळून शरीरांत एकजीव होते. ते भक्ष्य सुरईत अडकल्यावर तोंडावर झांकण बसते, त्यामुळे त्यास बाहेर सुटून जाण्यास मार्ग मुळीच उरत नाहीं.

 पान अगर पत्रः-(Lamina) पानांचा मुख्य भाग म्हणजे पत्र होय. पत्रांत देठापासून मध्यशीर शेंड्यापर्यंत सरळ जाते. मध्यशिरेपासून पुष्कळ पोटशिरा निघून किनाऱ्याकडे जातात. कित्येक वेळां एका मध्यशिरेऐवजी अधिक मध्यशिरा आढळतात, व प्रत्येकीपासून पूर्वीप्रमाणे पोटशिरा निघतात. ह्या सर्व शिरा मिळून पानांचा सांगाडा तयार होतो, शिरा एकमेकांत गुंतल्यामुळे त्यांचे जाळे बनते. कॉस्टिक पोटॅशमध्ये पाने शिजवून हळू हळू बोटाने थंड पाण्यांत त्यावरचा बलक सोडविला असतां केवळ सांगाडा दृष्टीस पडेल. अगर पावसाळ्यानंतर झाडाखालून पाने कुजून एखादे वेळी आयते तयार झालेले सांगाडे सांपडतात. सांगाड़े निरनिराळ्या आकाराचे असून साधे अगर संयुक्त असतात.

 शिरा : –पत्राचा आकार कधी साधा असतो अथवा पुष्कळ लहान लहान सांगाडे एके ठिकाणी मिळून त्यांस संयुक्त आकार येतो. शिरांच्या रचनेप्रमाणे पत्रास आकार येतो. जसे खोडावर फांद्यांची काही विशिष्ट रचना आढळते, तद्वत् पत्रांतील शिरांची विशिष्ट मांडणी असून त्या मांडणीप्रमाणे पत्रास निर निराळे स्वरूप प्राप्त होते. आंब्यांच्या पत्रांत देठापासून मध्यशीर सरळ शेंड्यापर्यंत जाते. मध्यशिरेपासून बाजूस पुष्कळ शिरा निघून एकमेकांत गुंततात व त्यामुळे पानांचा एकाकी साधा सांगाडा तयार होतो, म्हणून ते पान साधे असते. बेलाचे पानांत तीन लहान देंठ असून प्रत्येक दलाचा सांगाडा मुख्य शिरेवर चिकटून राहतो, व त्याचे स्वरूप आंब्याप्रमाणे साधे न राहृतां संयुक्त होते. सारांश शिरांची मांडणी निरनिराळी असून त्याप्रमाणे पानांस वेगवेगळे