पान:वनस्पतिविचार.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

येथे एवढे सांगणे भाग आहे की, सुत्रकोष्ठ केवळ ह्याच प्रकारचे असतात असे नाहीं. ते पानांसारखे अथवा पत्रांसारखे असतात. जसे, वाटाणे वगैरे. तसेच ते पानांची उपांगें बनतात. जसे, स्मायलॅक्स. म्हणून धाग्याचे उगमस्थान लक्ष्यात घेऊन ते सुत्रकोष्ठ, अथवा पर्णकोष्ट किंवा त्यांचे उपांग आहे हे ठरवावे. सर्व ठिकाणी त्यांचा उपयोग सारखाच होतो. सुत्रे येणाऱ्या वनस्पती बहुतकरून निर्बल वेल असतात. त्यास दुसऱ्याचा आश्रय घेऊन वर चढावयाचे असते व हीं सुत्रे त्या कामी उपयोगी पडावीत अशा नैसर्गिक तजवीज असते.

 पाणवनस्पतीः-पाण्यांत वाढणा-या वनस्पतींचे खोड टणक अगर कठीण नसते. बुंध्यात काष्ठ (Wood ) अथवा काष्ठतंतू (Wood fibres) फारसे वाढत नाहींत. बुंध्यामध्ये वायूयुक्त नळ्या ( Air canals ) पुष्कळ असल्या कारणाने वनस्पतींचें शरीर हलकें व पाण्यावर तरण्याजोगे होते. कमळाचा बुंधा चिखलात रुतून तेथेच त्याच्या मुळ्या सुटतात. बुंध्यापासून लांब दांडी निघून पाने पाण्याचे वरचे भागावर पसरतात. व्हलिसिनेरिया वनस्पतींत बुंधा चिखलांत वाढून पाने पाण्यामधून उभी सरळ वाढतात. कित्येक वनस्पतींत खोड पाण्याचे पृष्ठभागांवर तरंगत राहते, व पाणी वाहते असले तर त्याबरोबर तें वाहत राहते. जसे, शैवाल तंतू ( Spirogyra).

 शिंगाडा, पाणवनस्पती आहे. ह्याची लागवड उत्तर हिंदुस्थानांत पुष्कळ ठिकाणी पाणथळ जागेत, अगर तलावांत करितात मुंबई, ठाणे वगैरे ठिकाणच्या पुष्कळ लोकांनी ह्याचे खोड चिखलांत कसे रुजते, जागजागी मुळ्या कशा सुटतात, फुले कशी येतात, वगैरे पाहिलेच असेल.

 जमिनीवर पसरत जाणारी व पाण्यांत सरळ वाढणारी खोडे, ही दोन्हीं सारखी आहेत,असे म्हटल्यास हरकत नाहीं, जमिनीवर पसरलेल्या फांदीवर जागजागी कांड्यांतून मुळे सुटतात व वरील बाजूस पाने येतात, त्याचप्रमाणे पाण्यातील वाढत्या फांदीवर कांड्यांपासून मुळ्या सुटतात, व वरील बाजूस पानें यतात. फक्त दोन्हीमधील फरक म्हणजे एकाचे वाढण्याचे स्थान पाणी व दुसऱ्याचे स्थान जमीन. पाणी आटू लागले असतां पाणवनस्पती बुडाकडे चिखलावर पसरत जातात, व पुढे पाणी नाहीसे झाले म्हणजे त्या पाण्यांतील वनस्पती व जमिनीवर पसरणाऱ्या वनस्पती ह्या दोहोंत अंतर दिसत नाही.