पान:वनस्पतिविचार.pdf/61

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५ वे ].     स्कंद अगर खोड Stem.     ३३
-----

असते. म्हणूनच पानाचे ऐवजी ह्या जाड भागांत तो रंग उत्पन्न करून त्याकडून पानाचे काम करून घेणें अवश्य झालें. ह्याच प्रकारची बागेमध्ये शोभेकरितां लाविलेली झिलोफोलिया नांवाची रोपे आहेत. येथेही फांद्या पानाप्रमाणे पातळ व रुंद असतात. खरीं पाने फांद्यांचे किनाऱ्यावर असून त्याच ठिकाणी फुलांच्या कळ्या अगर फळे येतात,

 रसकस-( Ruscus ) नांवाची ह्या प्रकारचीच एक वनस्पती आहे. येथे साधारण लोकांस जी पाने वाटतात ती खरीं नसुन पानासारख्या फांद्या आहेत. ह्या पानाच्या मध्यशिरेवर मध्यभागी एक कळी येते. ही कळी पुढे वाढून त्यावर फुले येतात. ह्या कळीमुळे ती खरी पानें नाहींत ह्याची साक्ष पटते. शिवाय खरी पाने पापुद्र्यासारखी अपूर्ण स्थितीत वरील हिरव्या भागाचे बुडी येतात. अॅस्परेंगसमध्ये अशा प्रकारची पाने आढळतात. असल्या पानाप्रमाणे दिसणाऱ्या फांदीस ‘पर्णकोष्ठ' (Phylloclade) म्हणतात.

 कंटककोष्ठ (Thorn ) लिंबू, बेल, ग्लेडिटसचिया वगैरेमध्ये पानाचे पोटी कळीचे जागी एक जाड कांटा वाढतो. हा कांटा ज्या अर्थी कळीचे जागी आला असतो, त्या अर्थी तो कळी अथवा अन्य स्वरूप प्राप्त झालेला मुगारा असला पाहिजे. कधी कधी कांटा जास्त वाढून दुसरे लहान कांटे अगर लहान लहान पाने त्यावर येतात. एवढेच नव्हे तर फुले व फळेही त्यावर येतात. तेव्हा हे कांटे म्हणजे एक प्रकारच्या फांद्या होत. अशा खोडांस अगर फांद्यास ' कंटककोष्ठ' ( Thorn ) म्हणतात.

 कंटककोष्ठ (Thorn), कंटकपर्ण (Spine) व त्वककंटक (Prickle) ह्मा तिन्हीमध्ये पुष्कळ फरक आहे. कंटककोष्ठ हे खोड अथवा फांदी आहे. कंटकपर्ण हे एकप्रकारचे कांटेरी पान असते. तसेच त्वककंटक हे बाह्य त्वचेपासून ( Epidermis) कठीण, अणकुचिदार झालेले भाग आहेत. जसे गुलाबावरील कांटे इत्यादि. हे कांटे झाडून टाकले असतां गळून जातात, त्यांचा उगम खोल नसून बाह्य असतो.

 सूत्रकोष्ठ-(Tendril) कृष्णकमळावरील पानाचे पोटी सूत्रे अगर धागे येऊन ते त्यास वर चढण्यास उपयोगी पडतात. कळीचे जागी असले धागे असल्यामुळे त्यास फांद्या समजणे योग्य आहे. भोंपळे, द्राक्षे वगैरे झाडामध्ये असले धागे येतात. ह्या धाग्यास ‘सुत्रकोष्ठ' (Tendril ) म्हणतात.