पान:वनस्पतिविचार.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



५ वे ].     स्कंद अगर खोड Stem.     २९
-----

बहुवर्षायुमध्ये दरवर्षी फुले व फळे येऊन जातात. फुले येऊन गेली म्हणजे त्या मरतात असे नाहीं.

 वेळू, चिवे वगैरे वनस्पति द्विवर्षायु व बहुवर्षायु प्रकारांचे मध्य प्रकारामध्ये पडतात. फुले व फळे वेळूस एकदांच येतात व ती आली म्हणजे वेळू सुकू लागतो. हे लक्षण वर्षायु अगर द्विवर्षायुमध्ये आढळते. पण कित्येक ऋतूपर्यंत त्यास फुलें अथवा फळे येत नाहीत. पुष्कळ वर्षे टिकणे हे लक्षण बहुवर्षायूचे आहे. तेव्हां त्यास केवळ द्विवर्षायु अथवा बहुवर्षायु म्हणता येणार नाहीं.

 वरील वृक्ष, झुडे, झुडपे, ही सर्व बहुवर्षायु आहेत. फक्त रोपड्यांचा प्रश्न मात्र राहतो. कारण त्यांचे खोड पुष्कळ ऋतु टिकण्याजोगे नसते. रोपड्यांपैकी सुद्धा कांहीं बहुवर्षायु असतात. जसे-जाई, द्राक्षे, मोगरा, जुई इत्यादि. बाकीची बहुधा वर्षायु असतात. द्विवर्षायु फार थोडी आहेत. कारण त्यांमध्ये विशिष्ट प्रकारची मांसल मुळे असावी लागतात, बाजरी, मका, गहू, हरभरे, जव, मेथी, वगैरे सर्व वर्षायु आहेत. ती आपली सर्व कामें एक ऋतूत संपवितात.

फांद्यांचे इतर प्रकार.

 धांवती फांदीः–स्ट्राबेरी अगर ब्रह्मी वगैरेमध्ये खोड दोन प्रकारचे असते. पहिल्याप्रकारचे खोड एके जागी उभे असून जमिनींत त्याची मुळे सुटली असतात. ह्या खोडाची एक फांदी जास्त वाढून जमीनीवर पसरत जाते व तीजपासून पुनः दुसरे जागी मुळ्या फुटून तिचा एक रोपा तयार होतो. असल्या फांदीस धांवती फांदी Runner म्हणतात. स्ट्राबेरीचा रोपा प्रथम एक जरी असला, तरी अशारीतीने धावत्या फांदीपासून पुष्कळ रोपे तयार होतात. धांवत्या फांदीपाशीं मुख्य रोप्याचा संबंध तोडून टाकिला असता हीं तयार झालेली रोपें स्वतंत्रपणे आपला जीवनक्रम चालवू शकतात.

 कित्येक वनस्पतीचे खोड प्रथम जमिनीबाहेर हवेत वाढून त्यास लांब फांद्या येतात. ह्या फांद्या हवेत सरळ राहण्याची ताकत नसल्यामुळे जमिनीकडे वाकून जमिनीशी चिकटतात व चिकटलेल्या जागी मुळ्या सुटतात. मुळ्या जमिनीत रुजल्या असत त्यापासून इतर रोपे तयार करता येतात. जसे गुजबेरी, जाई, वगैरे.