पान:वनस्पतिविचार.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

समोरासमोर अशी आडवीं पाने येतात. येथे मुख्य कोंबाची वाढ खुटून खाली असणाऱ्या दोन पानांतून निराळ्या फांद्या वाढतात. ह्या फांदीच्या प्रत्येक अग्रावरील वाढत्या कोंबाची वाढ खुंटून पूर्ववत् खाली असणाऱ्या दोन समोरासमोर पानांमधून दोन फांद्या वाढतात. सर्वसाधारणपणे अशा वनस्पतीस द्विपादा' ( Dichotomous ) प्रमाणे आकार येतो, पण हा खरा द्विपाद नाहीं. कारण द्विपादामध्यें अग्रावरील कळीचे दोन भाग होऊन त्या प्रत्येक भागाची एक एक फांदी बनते. येथे अग्रावरील कळीची वाढ ख़ुटून जवळील पानांचे पोटांत (Axil) दोन कळ्या असतात. त्यापासून दोन फांद्या तयार होतात. नीट बारकाईने तपासले असतां चूक सहज लक्ष्यांत येते. अशा व्यवस्थेस नेहमी पाने समोरासमोर असणे अवश्य आहे. ह्या व्यवस्थेस 'नियमित द्विपाद' (Dichasium) म्हणण्यास हरकत नाहीं.

 दुधी वगैरेमध्ये मुख्य अग्रावरील कळीची वाढ खुंटून त्यांचे जवळील पानांचे पोटी जी कळी असते, तीच मोठी होऊन जणू मुख्य खोड आहे किं काय, असे वाटू लागते. येथील खोड फांद्यावर फांद्या ठेवून बनला असतो. हे ओळखण्याची सोपी युक्ती म्हणजे त्या पानांत दुसरी कळी असल्याची खूण नसते. जेव्हा फांद्या सरळ वाढतात, त्या वेळेस ही व्यवस्था अनियमित वर्गापैकी असावी, असे वाटते. पण वास्तविक तशी स्थिति नसते. कारण पानाचे पोटी कळी नसते किंवा कळी असल्याची खूणही नसते. पानाचे पोटीं कळी असणे अवश्य आहे. येथे पानाचे पोटांत निराळी कळी नसून त्या कळीची फ़ांदी वाढली आहे अशी खात्री पटते. तसेंच वर वाढलेला भाग हा मुख्य खोड नसून ती फांदी वाढली आहे, हे सहज लक्ष्यांत येते.

 हा प्रकार अनियमितापैकी आहे, असे जरी प्रथम वाटते, तथापि पानाचे पोटी कळीचे अभावामुळे तो अनियमित नसून नियमित आहे, असे निश्चित ठरते. अशा प्रकारास ‘एकमार्गी नियमित ' (Sympodial) असे नांव फांदीचे मांडणीमुळे योग्य दिसते.

 कित्येक पानांचे पोटांत एक कळी अथवा भुगारा न निघतां दोन किंवा तीन भुगारे निघतात, व ते वाढून त्याच्या दोन किंवा तीन फांद्या तयार होतात. अशा वेळेस कळ्या जास्त झाल्या असतां पानांचे पोटाबाहेर ढकलल्या