पान:वनस्पतिविचार.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

साधारण धर्म आहे. मुळ्यांवर बुडाकडून अग्राकडे दुय्यम मुळ्या येतात. खोडावरील फांद्यांची जागा नक्की ठरविता येते. त्या जागेस कांडे अथवा सांधा म्हणतात. सांध्याखेरीज इतर जागेवर फांद्या कधीही येत नाहीत. दोन कांड्यांचे अंतर कमी-अधिक असते. विशेषेकरून तृणजातींमध्येही ही स्पष्ट दिसतात.

 आवरणे:-खोडावर पानांचे पोटीं (Axil ) नेहमी एक कळा असते. ह्या कळीभोंवतीं आवरणे असून त्यांचा उपयोग शीतोष्णापासून कळीचे संरक्षणाकडे होतो. कळी वाढू लागली असतां हीं आवरणे आपोआप गळून जातात. तसेच खोडाचे वाढते अग्रही ह्याचप्रकारे आवरणांनी आच्छादित असते. आवरणे गळल्यावर आंतील पानांवर पाने असलेला वाढता कोंब दिसू लागतो. कोंब वाढू लागला म्हणजे पाने आपोआप खाली सुटून तो पुनः पूर्वीप्रमाणे आंतून उत्पन्न होणाऱ्या कोवळ्या पानांनी वेष्टिला जातो. शीतप्रदेशांत हिंवाळ्यामध्ये ह्या कळ्यांची वाढ बहुतेक थांबते. अशावेळी थंडीपासून त्यांचे संरक्षण होणे जरूर असल्यामुळे असली आवरणे नेहमी त्या कळ्यांवर येत असतात.

 ही आवरणे जाड असून त्यांवर मेणासारखा चिकट पदार्थ जमतो. ह्या चिकट मेणामुळे थंडीचा परिणाम आंतील नाजुक भागांवर होऊ शकत नाहीं, नाहींतर थंडीमुळे तो वाढता कोंब केव्हांच करपून गेला असता. फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यांत पिंपळाचे अथवा वडाचे झाडाखालून गेले असतां शेकडों गळलेली आवरणे आढळतात. कारण तो काल वसंतऋतूचा असल्यामुळे कळ्या फुटून उमलू लागतात. शिवाय थंडीसुद्धा कमी होत असते. जेथे झाडाच्या कळ्यांचा अत्युष्ण अथवा अती शीत हवेशी सबंध येत नाही, तेथे आवरणाची जरूरी नसते. आवरणे येणे, न येणे, हे झाडांच्या परिस्थितीवर अवलंबून असते. जेथे ज्यांचा उपयोग तेथे त्या पदार्थांचे अस्तित्व, निरुपयोग तेथे त्याचा अभाव, असा सार्वत्रिक नियम आहे.

 फांद्यांची उत्पत्तिः–बुंध्यावरील पानाचे पोटीं कळ्या वाढू लागल्या ह्मणजे पान गळून जाते, अथवा तसेच राहते. शिवाय सर्व कळ्या वाढल्याच पाहिजेत असा नियम नाहीं, कांहीं कळ्या वाढतात व कांहीं आपोआप गळून जातात, अथवा अन्य कारणांनीं कांहीं नाहीशा होतात. कळ्या