पान:वनस्पतिविचार.pdf/49

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४ थे ].     मूळ Root.     २१
-----

वेलीचे वर्णन पूर्वी आलंच आहे. हा वेल आश्रयाचे झाडास विळखे मारून अगदी गच्च धरतो. विळखे सोडवितांना मुळ्या फांदीत घुसल्या कारणाने ती सहसा सुटत नाहींत. ह्या मुळ्यांकडून आश्रयाच्या झाडांतील अन्नरस शोषण करून अमर-वेल वाढत असतो. वेल मोठा वाढत गेला असतां आश्रयाचे झाडावर वाईट परिणाम होतो. दिवसानुदिवस ते झाड आपोआप खंगू लागते. त्यावरील फुलें अगर फळे चांगली पोसत नाहीत. कारण जें नवीन अन्न त्यांत तयार होते ते बहुतेक त्या मुळ्या शोपून घेतात.

 बांडगुळाची सुद्धा अशी स्थिति असते. बांडगुळे आंब्याचे अगर फणसाचे झाडावर वाढतात. त्यांची फांदी आंब्याचे फांदींत घुसते. तेथून आंत मुळे घुसतात. बांडगुळाची पाने हिरवी असून पूर्ण वाढलेली असतात. त्यामुळे त्यांस हवेतून स्वतंत्रपणे कार्बन-आम्लवायु शोषितां येतो. बांडगुळे केवळ अन्नरसाकरितां आश्रयाचे झाडावर अवलंबून असतात. पानांतील हरितवर्णपदार्थाच्या (Chlorophyll) साहाय्याने कार्बन आम्लाचे विघटीकरण करून अन्नरसाच्या मिश्रणामुळे त्यास सेंद्रिय पदार्थ करितां येतात. म्हणूनच आश्रयाचे झाडाचे फारसे नुकसान होत नाही, पण अमरवेलाची गोष्ट ह्याहून वेगळी असते. अमरवेल पिवळ्या रंगाचा असून त्याची पानें अपूर्ण असतात.हरित-वर्णपदार्थाच्या अभावामुळे हवेतून त्यास स्वतंत्रपणे कार्बन संस्थापना करितां येत नाही. त्यास शरीरपोषणाकरिता दुसऱ्यावर पूर्णपणे अवलंबून रहावे लागते, म्हणून बांडगुळापेक्षां अमरवेलाने ज्यास्त नुकसान होते. वेळेवर काळजी न घेतली व अमरवेलाचे लोंबते धागे काढून टाकिले नाहीत, तर आश्रयाचे झाडास पुष्कळ नुकसान पोहचते. बागेतील झाडावर बांडगुळे अथवा अमरवेल वाढू लागली असतां; ताबडतोब ते नाहींसे करावेत, दुर्लक्ष्य करिता उपयोगी नाही.

 वनस्पतींचे रोग ह्याच प्रकारचे परान्नभक्षक आहेत व ते सर्व केवळ परावलंबी असतात. त्यांची उपजीविका दुसऱ्या वनस्पतीवर नेहमी होत असते. अतिथी व यजमान हा परस्पर संबंध येथे लागू पडतो. त्या वनस्पति म्हणजे यजमान व त्यांवर अवलंबून राहणारे रोग हे त्यांचे अतिथी होत. पण अतिथीस एकंदर चांगली जागा व अन्नदान दिले म्हणजे तो अतिथी संतुष्ट होऊन