पान:वनस्पतिविचार.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

चरितार्थ चालवितात. डहाळ्यांसभोंवतालचा विळखा सोडवून पाहिला म्हणजे मुळे डहाळींत घुसलेली दृष्टीस पडतील. विळखे सहसा सोडविता येत नाहीत; कारण मुळे आंत घुसल्यामुळे त्यांचा डाहळीशी एकजीव झाला असतो. अशा वनस्पति खरोखर परान्नपुष्ट आहेत, ह्यांत संशय नाहीं. ह्या वेलास कांहीं लोक नारूचा वेल म्हणतात. हा वेलसुद्धा वनस्पतीच्या उच्च वगांपैकी आहे; परंतु मोहरीप्रमाणे सर्व अवयवे ह्यामध्ये पूर्णावस्थेस आलेली नसतात.

 ( फर्नः )–बागेतील शीतगृहामध्ये ' फर्न' नांवाचे हिरवे रोपे कुंड्यांतून लाविलेले नेहमी दृष्टीस पडतात. त्यांचे खोड मातींत असून, बाहेर त्यांची पाने लांब वाढली असतात. पानांचे अग्र उलट्या गुंडीप्रमाणे बनले असते. ह्यास फुले कधी येत नाहीत. पानांच्या पाठीमागील भागांवर किनाऱ्यापाशी लहान फोडाप्रमाणे फुगवटे असतात. फुगवट्याचे आवरण उघडून पाहिले असतां आंत पिंगट रंगाची भुकटी आढळते. ही भुकटी सूक्ष्मदर्शक यंत्रासालीं तपासली असता ती पेशीमय आहे असे आढळून येते. प्रत्येक पेशी योग्य परिस्थिति मिळाली असतां उगवते. कांहीं काळ ही उगवती स्थिति जमिनीत राहून नंतर त्यापासून पूर्वीप्रमाणे हिरवा रोपा बाहेर दिसू लागतो. ह्या रोपड्यांची उत्पत्ति त्या पिंगट भुकटीपासून होते. फळांतील बीजाप्रमाणे येथे बीजे असत नाहीत. ही वनस्पति क्षुद्र जातीपैकी आहे.

 भूछत्रेः-पावसाळा सुरू झाल्यावर उकिरड्यावर भूछत्रे (Mushroom.) उगवलेलीं नेहमी पाहण्यांत येतात. वरील भाग छत्रीसारखा असून खाली जाड दांडी जमिनीत गेली असते. छत्रीच्या खालील पृष्टभागांवर लहान लहान झालरीप्रमाणे पडदे असतात. ह्या पडद्यांमध्यें धूसर रंगी भुकटी आढळते. ह्यास फुले अथवा फळे येत नाहीत, ह्याची अवयवे इतरांप्रमाणे पूर्णावस्थेस पोहोचलेली नसतात, खोड, पाने वगैरे भाग असत नाहीत. वरील वनस्पतीप्रमाणे ह्यांत हिरवारंग दिसत नाही. ही भूछत्रे आपली उपजीविका मृतसेंद्रिय पदार्थांवर करतात. हवेतून पौष्टिक द्रव्ये शोषण करण्याची शक्ति ह्यांमध्ये नसते. ह्यांची उत्पत्ति पडद्यामध्ये असणा-या भुकटीपासून होते. कांहीं ठिकाणी त्यांचा भाजीसारखा उपयोग करतात. कुत्र्याच्या मुतापासून हीं उत्पन्न होतात, असा समज आहे; पण तो खरा नाहीं. भू-छत्रे क्षुद्रवनस्पति आहेत.