पान:वनस्पतिविचार.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

 विचार करून एकत्र केलेली माहिती असते. पुष्कळ लोकांचे अनुभव, त्यांचे शोध, त्यांचे विचार एकत्र करून निरनिराळ्या दिशेने त्या विषयावर नवीन प्रयत्न करणे म्हणजे त्या विषयाच्या शास्त्राचा अभ्यास करणे हे होय, भौतिक शास्त्र केव्हाही परिपूर्ण झाली नाहीत अशी शास्त्रे पूर्णावस्थेस पोहोंचली असे म्हणणे म्हणजे, आपलें अज्ञान प्रगट करणे होय. रोज रोज नवीनं चमत्कार आढळतात. त्या चमत्कारांची योग्य मिमांसा करणे मोठे कठीण असते. चमत्कारांचे कोडे उलगडणे म्हणजे तत्संबंधी पूर्ण ज्ञान होणे होय. उपलब्ध ज्ञान संपादन करून नवीन ज्ञानाची भर पूर्वीच्या ज्ञानांत घालणे फार प्रयासाचे आहे; व ह्याहून अधिक प्रवासाचे काम कोडें उलगडण्याचे आहे. विशेषेकरून जीवनशास्त्रासंबंधी अधिक अज्ञान कबूल करावे लागते. कारण त्या शास्त्राचे नियम केवळ एक दृष्टीने पाहतां उपयोगी नाहींत. त्या नियमांवर अम्मल करणारी निराळी चैतन्य शक्ती असते. साध्य व्यावहारिक गोष्टी कोणत्या आहेत व जीवनशक्तीच्या अंमलाखाली कोणत्या येणाऱ्या आहेत, हे समजावयास फार मुष्कील पडते.

 इतकी इतर शास्त्रीय मीमांसा झाल्यावर आपण आपल्या मुख्य विषयांकडे वळणे उत्तम आहे. आपणांस वनस्पतिशास्त्राविषयी विचार करावयाचा आहे, तर कोणत्या गोष्टींचे विवेचन त्या शास्त्रांत येणे जरूरीचे आहे, इकडे लक्ष्य देणे भाग आहे. 'वनस्पति' म्हणजे काय, ही कल्पना पूर्ण झाल्यावर त्यांची बाह्यरचना व अंतररचना याचा विचार करावयाचा आहे. बाह्यांग व अंतरंग माहिती झाल्यावर प्रत्येक अंग व अवयव कोणत्या कामास उपयोगी पडते, त्यापासून वनस्पतीस काय फायदा होतो, ती अंगें प्राणिमात्रांच्या अवयवांसारखी आहेत काय, त्यापासून तीच कार्ये घडतात काय, वगैरे गोष्टींची माहिती देण्याचा विचार आहे. वनस्पतीच्या निरनिराळ्या जाति, क्षुद्र वर्ग व उच्च वर्ग ह्यांतील फरक, पुष्पयुक्त अथवा पुष्परहित तरुवर्ग ह्यांच वर्गीकरण, तसेच परस्पर अवयवांचा संबंध व त्यापासून उत्पन्न होणारी उपयोगी द्रव्ये, यांचे वर्णन योग्यवेळी देण्यात येईल. बालसंगोपन, वंशवर्धन व शरीररक्षण ही तीन्हीं कार्ये कशी घडतात, व तत्संबंधी चमत्कार वगैरे गोष्टी, क्रमाक्रमाने वर्णन करण्याचा विचार केला आहे.

---------------