पान:वनस्पतिविचार.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
     वनस्पतिविचार,     [ प्रकरण
-----

फरक दिसू लागले. दोन्हींचे आद्य व अंतिम हे सारखेच. जनन, पोषण व मरण ही दोन्हीला सारखीच. पहिलें सजीव तत्त्व म्हणजे वनस्पति व दुसरें सजीव तत्त्व, प्राणी हे होय.

 रोपा, बीजापासून उत्पन्न झाल्यावर जमीनीतून, तसेच हवेतून, पाणी व अन्नद्रव्ये त्यास मिळवावी लागतात. फुले, फळे, व बी उत्पन्न होऊन शेवटी तो रोपा मरून जातो. तद्वतच प्राणी जननीपासून उत्पन्न होऊन कांही दिवस तिजवर पोषणासाठी अवलंबून राहतो. कांहीं काल लोटल्यावर त्यास स्वतंत्रपणे पोषणाची सोय करितां येते. शेवटीं तो जगांत होता ह्याची ओळख ठेवून नाहीसा होतो. म्हणजे जनन-मरणादि साधारण नियम दोन्ही, वनस्पति व प्राणी ह्यांस सारखेच लागू आहेत.

 आंब्यापासून आंबे, पेरूपासून पेरू, हरभऱ्यापासून हरभरे, शिरसापासून शिरस, तसेच गव्हांपासून गहूं उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे प्राणिवर्गामध्ये गाईपासून गाई, घोड्याासून घोडे, मांजरापासून मांजरे, मनुष्यापासून मनुष्यें उत्पन्न होतात. म्हणजे ज्याप्रकारचे पूर्व सजीवतत्त्व असेल, त्याप्रकारचे बीज त्यांपासून उत्पन्न होते. सजीव वस्तूंपासून सजीव वस्तु उत्पन्न होते व ती मुख्य तत्त्वांत आपल्या पूर्व तत्त्वाप्रमाणे असते, यांत संशय नाहीं. बाह्य गोष्टीमुळे कदाचित् क्षुल्लक बाबींत थोडा फरक दिसेल, पण हा फरक विशेष नसतो.परिस्थितीप्रमाणे आकारसादृशांत फरक पडत जाईल. कदाचित हा आकारसादृश्याचा फरक आनुवंशिक होत जाऊन त्यापासून जाति, उपजाति, पोटप्रकार बनतील, पण ही स्थिति येण्यास युगानुयुगे लागतात. डार्विन साहेब उत्क्रांति मधल्या सूक्ष्म फरकामुळेच विचित्रकोटी प्राणी अथवा वनस्पति झाल्या असे लिहितो. मानव कोटीची पहिली स्थिति माकडासारखी असावी असे तो अनुमान काढितो. मानव जातीचे पूर्वज माकडे आहेत हे जरी गृहीत धरून चाललें, तथापि तो काल कल्पनातीत आहे. शिवाय माकडापासून फरक कसे होत गेले हे दर्शविणाऱ्या मधल्या पोटजाति जितक्या असावयास पाहिजेत तितक्या नाहींत. खरोखर माकडाची जात कमी असून मध्ये पोटजातींचा भरणा अधिक असला पाहिजे; पण त्याचे उलट दिसत आहे. मधल्या साखळीचा उलगडा चांगला होत नाही, म्हणूनच बीज तसे अंकुर हे सिद्धतत्त्व आहे, असे समजण्यास सार्वत्रिक हरकत नाही.