पान:वनस्पतिविचार.pdf/232

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

- दमट हवेमुळे उत्पन्न होणारी बुरशीसुद्धां आळंबी ( Fungus )वर्गापैकी आहे. हवेतून बुरशीच्या जननपेशी (Spore) नेहमीं उड़त असतात. योग्य दमट परिस्थिति मिळाली म्हणजे ताबडतोब त्यांचा प्रादुर्भाव होऊ लागतो. हृळूहळू त्यांपासून पांढऱ्या नळ्या उत्पन्न होऊन पुढे त्यांचे एक जाळे बनते. ह्या जाळ्यांपैकी कांहीं नळ्या हवेत वाढून त्यांची अग्रे वाटोळी होतात. ह्या वाटोळ्या भागांत जीवनकण पुष्कळ जमून, त्यांपासून जीवनपेशी तयार होतात. योग्य वाढ होऊन पक्वस्थिति झाली असता त्यांची बाह्यभित्तिका फुटून आंतून शेकडों स्वतंत्र जननपेशी बाहेर पडतात. ह्या जननपेशी हवेतून उडू लागतात, व पुनः पूर्वीसारखी दमट परिस्थिति मिळाली असता त्यांची उत्पत्ति होते. ह्या उत्पत्तीमध्ये स्त्रीपुरुषत्वसंयोग होत नसतो; पण काही वेळा येथेही स्त्रीपुरुषतत्त्वसंयोग होऊन उत्पत्ति होते. बुरशीच्या दोन विशिष्ट नळ्या परस्पर भिडून त्यांतून जीवनतत्त्वें परस्परांशी संलग्न होतात. संलग्न होण्याचे पूर्वी नळ्यांचे अग्रांजवळ आडवा पडदा येऊन त्यांपासून संयोगपेशी तयार होते. ह्या संयोगपेत जीवनकण एके जागी साठून पडदा आल्यामुळे ते कण दुसरे जागी जाण्याची भीति नसते. पेशींचा बाह्य पडदा फुटून एकांतून सर्व जीवनकण दुसऱ्यांत शिरून तेथील कणांशी संयोग पावतात. ह्या वेळेस त्या नळ्यांचा इतर भाग रिकामा असून, फक्त संयुक्त झालेल्या पेशींतच द्रव्याचा भरणा होतो, व त्या भागास काळसर रंग येतो. कांहीं काल ह्या मुग्ध दशेंत ती पेशी राहून पुढे आपोआप तिची बाह्य कवची फुटून आतील गर्भ वाढू लागतो, उगवल्यावर पुनः त्यावर जीवनपेशी तयार होतात. ह्या वेळेस बुरशीचे तंतुमय शरीर जाळीदार बनत नाही. ह्या संयोगांत दोन्ही संयोगपेशींतील तत्वे एकाच प्रकारची असून त्यांत स्त्री व पुरुष असा भिन्नभाव नसतो.

 कधी कधी प्रथम वनस्पतीची उत्पात्त जननपेशी (Spore ) पासून होऊन पुढे कांहीं कालाने त्याच वनस्पतीत संयोगास योग्य अशी अवयवें उत्पन्न होतात. अवयवें एकत्र येऊन आंतील संयोगतत्वांचा एकजीव होतो व त्या एकजीव झालेल्या वर्गापासून पुनः पूर्ववत् वनस्पति उत्पन्न होते. म्हणजे एका वनस्पतीचे जीवनचरित्रांत कांहीं साध्या जननपेशी ( Spore ) पासून उत्पत्ति व पुढे स्त्रीपुरुषतत्व संयोगउत्पत्ति अशा दोन्ही तऱ्हा आढळतात. असला मिश्र प्रकार दुय्यम प्रकारच्या शैवालवर्गांत नेहमी आढळतो.