पान:वनस्पतिविचार.pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१३

योगी अशी विशिष्टसाधनसामुग्री ईश्वराने दिलेली असते. तिच्या साहाय्याने भिन्न परिस्थितीचे ज्ञान करून घेण्याची खटपट करणे म्हणजे खिशांतलें घड्याळ दुरुस्त करण्यास खोरे, कुदळ, पहार, ओळंबा, गुण्या, इत्यादि साधने मागण्यासारखेच अजागळपणाचे होते. याकरितां मला स्वतःसंबंधाने अमुक इतकें माहित आहे, बाकीचे माहित नाहीं, इतरासंबंधाने माहित असणे शक्यच नाही, असे म्हणून गप्प तरी बसावे, नाहींतर हाती घेतलेली घटपटादि खटपट ऊर्फ काथ्याकूट अशीच चालू ठेवावी. काय निष्पन्न होईल ते होईल. पहिल्यापेक्षा दुसरा मार्ग अधिक प्रशस्त होय हे उघड आहे. ' चक्षुर्वैसत्यं ' हा सिद्धांत उराशी बाळगून मैल, दोन मैल, तीन मैल जेथवर नजर पोचेल तेवढेच काय ते जग त्याच्यापलीकडे कांहीं नाहीं, अशी दृढ समजूत करून घेऊन अगदी गप्प बसणे कधीही योग्य होणार नाहीं. ईश्वराने दिलेल्या डोळ्यांचा उपयोग करून सर्व वस्तु पहाण्याचा प्रयत्न करावा. मात्र यच्चयावत् वस्तु दिसतील अशी दुराशा मात्र धरूं नये. कारण सर्व वस्तु पहाण्यासारखे डोळे ईश्वराने आम्हांस दिलेच नाहीत. याची खात्री बाळगावी आणि हवी तर प्रतीति घ्यावी. या डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तु देखील पहाण्यास अंतर, सुषुप्ति, विस्मरण वगैरे अनेक अडथळे असतात. ते दूर करून पहावे. लंडन पहाण्यास इंग्लंदलाच जावे लागणार व त्याप्रमाणे जावे, झोपेमध्ये वस्तु दिसली नसेल, तर जागेपणी पहावी. विस्मरण झाले असल्यास वस्तु पुन्हां पहावी. प्रत्यक्षाचा उपयोग झाल्यावर अनुमान व उपमान याही साधनांचा उपयोग करून पहावा आणि या चर्म अगर ज्ञान चक्षूूंंच्या आवाक्याबाहेरील गोष्टीबद्दल आपण जे सिद्धांत काढू ते केव्हां उलथून पडतील याचा विलकुल भरंवसा नाहीं ही गोष्ट मात्र अगदी विसरता कामा नये. कारण ही गोष्ट विसरणे म्हणजे आपल्या नेत्रेंद्रियाचे वैगुण्य विसरणेच होय. उदाहरणार्थ, आमची स्मरणशक्ति किती कोती आहे पहा. आपण प्रत्येकजण आपल्या जन्मानंतरच्या पहिल्या वर्षांत जिवंत होतों ही आपली खात्री आहे आणि त्या कालांत आपण आहारनिद्रादि अनेक कर्मे केली याबद्लही संशय नाही. परंतु त्यांतील एकाची तरी आठवण कोणा एकास तरी असू शकेल काय ? नकारार्थीच उत्तर येणार हे उघड आहे. तर मग तुला आठवेल तेवढेच खरे; ही कोलीत जर एखाद्या खुळ्याच्या हातांत दिली तर त्याने वेडे वेडे चार केल्यास त्यांत नवल काय ?