पान:वनस्पतिविचार.pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१२



फारसे त्यांच्यामध्ये दिसत नाहीं. लाजरी (लाजाळू) मख्खीमार ( flytrap ) इत्यादि वनस्पति अपवादरूपीच होत. यामुळे वनस्पतींना विचार करण्याची ताकद नाही, असेच आपण आजमितीस समजत आहों. सारांश-वनस्पतिविचार म्हणजे झाडाझुडांबद्दलचे शहाण्यासुरत्या मनुष्यांचे विचार होत. हें विचार करीत असतांना मनुष्याच्या हातून एक नकळत चुकी होत असते, तिच्याबद्ल जरा सावधगिरी ठेवणे अत्यंत इष्ट आहे. ही चुकी म्हणजे सर्वज्ञत्वाची घमेंड बाळगणे ही होय. मोठमोठे विचारी म्हणविणारे लोक देखील ही घमेंड केवळ नकळत बाळगतात. आपण अज्ञ मूढ वगैरे असल्याचे तोंडाने कबूल करावयाचे; परंतु ज्या गोष्टींचें ज्ञान करून घेण्याची साधनेच ईश्वराने दिली नाहींत-एवंच जें ज्ञान केवळ दुष्प्राप्य- त्याबद्ल मारे लंबे लंबे गोष्टी सांगावयाच्या. उदाहरणार्थ, चंद्रावर वातावरण आहेसे दिसत नाही म्हणून किंवा सुर्य ज्वलत हायद्रोजननें वेष्टिलेला असावासे वाटते म्हणून, खगोलशास्त्र विशारदांनीं अगर व्यासंग्यांनी उभयतां चंद्रसूर्यांवर जीवाचा अभाव ठाम ठरवू पहाणे म्हणजे कितीतरी धार्ष्ट्य हें ! ज्याप्रमाणे आपण येथे प्राणवायूवर प्राण धारण करितो, त्याप्रमाणे जळत्या हायद्रोजनवर प्राण धारण करणारे अगर मुळीच कोणताहि वायु शरीरात न घेणारे जीव कदाचित् असण्याचा संभव आहे, अशी कल्पना देखील करणे शक्य नाहीं काय ? मनुष्याला ईश्वराने फुप्फुसे दिली आहेत, त्यायोगे तो हवेमध्ये श्वासोच्छ्वास करतो आणि पाण्यात बुडाल्यास फुप्फुसांत पाणी जाऊन तो मरतो; एवढ्यावरून त्याला पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जीव नसावे, असे अनुमानितां येईल काय ? तेथे मासे, मगर, सुसरी, शेवंडे, खेकडे, झिंगे इत्यादि हजारों प्रकारचे प्राणी असतात; व पाण्यात विरलेला प्राणवायु घेता यावा, याकरितां त्यांना ईश्वराने फुप्फुसांच्याऐवजी कल्ले दिले आहेत, अशा माशाला जमिनीवर येतां येत नाहीं, मग हवेमध्यें संचाराचें नांवच नको. याकरितां जर हवेमध्ये कोणताही प्राणी असू शकावयाचा नाही म्हटले तर ते वस्तुस्थितीस अनुसरून होईल काय ? भिन्नभिन्न परिस्थितीस साजेल अशा प्रकारानेच ईश्वराने वनस्पति आणि प्राणी यांची वाटणी केली आहे आणि यामुळेच गोव्यासारखा आंबा लंडनमध्ये मिळावयाचा नाही, आणि ओक, एबनी, महागनी, वगैरे वृक्ष मुंबईमध्ये मिळावयाचे नाहीत. विशिष्ट रितीच्या परिज्ञानास अवश्य व उप-