पान:वनस्पतिविचार.pdf/216

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

स्त्रीकेसरदलाच्या दोन बाजू एकपाठीकडील ( Dorsal ) व एकपोटाकडील ( Ventral ) हें पूर्वी सांगितलेच आहे. स्त्रीकेसरदलाची मध्यशीर ही पाठीकडील बाजू होते व कडा एकेजागी जळन पोटाकडील बाजू बनते. जेव्हा पुष्कळ स्त्रीकेसरदलें परस्परांस चिकटून संयुक्त अण्डाशय तयार होतो, अशावेळेस परिघाकडील बाजू ही मध्य शिरेकडील बाजू असते व पोटाकडील बाजू आंतील भाग असून तेथेच त्यास बीजे चिकटली असतात. फळे फुटून बीजे बाहेर मोकळी होतांना ह्या बाजूचा उपयोग असतो. बहुतकरून फळे किनाऱ्याकडे पोटाकडील अथवा पाठीकडील बाजूशी फुटतात. नेहमींची रीत म्हणजे ज्या बाजूस बीजें चिकटली असतात, ती प्रथम फुटून बीजें मोकळी होतात. तूर, उडीद, मसूर वगैरे डाळवर्गात फळांत दोन्ही बाजू फुटून आंतील पडदे गळून बीजें मोकळी होऊन बाहेर पडतात. जितकी स्त्रीकेसरदलें ( Carpels ) असतात, तितकी पडद्यांची संख्या असते. तसेच अण्डाशयांतील खण व कप्पे यांवरही त्यांची संख्या अवलंबून असते. संयुक्त फळांत सर्व स्त्रीकेसरदले मध्यभागी चिकटल्याकारणाने सर्व विभाग पावणारे पडदे एकेजागी जमून त्यांचा एक उभा जाड सोंट तयार होतो. फळ फुटू लागले असतां हा पडदा आतील बाजूस सैल होऊन सुटा होऊ लागतो व त्याबरोबरच बीजेंही गळू लागतात. कित्येक फळे सरळ उभी न फुटतां, पेटीचें झांकण जसे उघडते त्याप्रमाणे आडवी फुटतात. कांहीं वेळां फळे आडवीं फुटतांना अर्धी बाजू फुटून, अर्धी बाजू तशीच चिकटून राहते. अथवा पुष्पकोश ( Calyx ) फळांशी संलग्न असल्यामुळे वरील बाजु तेवढी आडवी फुटते, व खालील अर्धा भाग पुष्पकोशाच्या संयोग-जोरामुळे चिकटून राहतो. जसे—कडहल ( Monkey-pot). अफू, अंटिराह्यनम्, तंबाखू वगैरे फळे न फुटतां त्यावर बारीक बारीक छिद्रे पडून त्यांतून बीजे गळू लागतात. ही छिद्रे कांही ठिकाणी अग्राकडे, कधी बाजूकडे, अगर बुडाकडे पडतात. फळे अव्यवस्थितपणे फार क्वचित् फुटतात. मोहरी, शिरस, वगैरेमध्ये दोन्ही पडदे फुटून बीजे त्याबरोबर न गळतां मध्यकणांशी चिकटून राहतात. कापूस, केशरी बोंड, वगैरेमध्ये पडदे फुटून अण्डाशयाची दले वेगळी होऊन त्यांत बीजे राहतात. एरंडीमध्ये फळाची तीन शकले होतात, पण बीजें वेगळी होत नाहीत. प्रत्येक शकलात एक एक बीज असते.