पान:वनस्पतिविचार.pdf/214

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

नये ? कारण परागकण व बीजाण्डे ही दोन्ही पुरुष व स्त्री जननपेशी(Spores) माहेत. पण तसे न करितां गर्भीकृत अण्डाशयासच फळ हे नांव देतात. कांहीं क्षुद्रवर्गींत खऱ्या फळासारखे फळ आढळते. असो. उच्चवर्गात फळे वेगवेगळ्या तऱ्हेची आढळतात, तेव्हां आपण तिकडेच वळावें हें बरें.

 गर्भधारणा झाल्यावर फळ बनू लागले असता त्यांत नवीन पेशींची भर होत जाते, अथवा कांहीं उलट पेशी कमी होऊन त्यांस निराळेच स्वरूप प्राप्त होते. धोत्रा, बाहवा वगैरेच्या अण्डाशयांत फळ वाढतांना नवीन कप्पे अगर खण उत्पन्न होतात. हे निरनिराळे पडदे नाळेपासून वाढून दोन्ही बाजूंस मिळाल्यामुळे नवीन नवीन खण एकावर एक बनत जातात. बाभळीची शेंग अशाच प्रकारची असते. धोत्र्यासंबंधाचे मागें वर्णन सांगितलेच आहे. ओकवृक्षाच्या फळांतील अण्डामध्ये तीन केसरदलें (Carpels) असून प्रत्येकांत दोन अण्डे असतात; पण पुढे गर्भधारणा होऊन फळ तयार होऊ लागले असता त्यांत एकच बीज उत्पन्न होते. शिवाय खणांची संख्या तिन्हींची एकावर येते. म्हणजे पांच बीजाण्डे व दोन स्त्रीकेसरदलें (Carpels) फळाच्या वाढिंत नाहीशी होतात.

 अशाचप्रकारची स्थिति पुष्कळ फळांत आढळते. झेंडूच्या फुलांत दोन स्त्रीकेसरदले असून फळामध्ये एक कप्पा व एक बीज राहते. पपनस, चकोत्रा, साखरलिंबू, केळी, डाळिंब, पेरू वगैरे फळांत मधुररस व गोडचव फळे पक्व झाली असतां उत्पन्न होते. अण्डाशयाच्या तसेच नाळेच्या पेशी मऊ मांसल होऊन पेशींत मधुररस उत्पन्न होत जातो. पुष्कळ वेळां नाळेच्या पेशी अधिक मांसल होऊन फळांमध्ये गीर अगर बलक तयार होतो. जसे-पेरू, टोमॅटो, वांगे, वगैरे.

 जरी वर फळाची व्याख्या गर्भीकृत पक्वअण्डाशय अशी केली आहे, तथापि व्यवहारांत फळ ही संज्ञा लावतांना ह्या व्याख्येकडे दुर्लक्ष केले जाते. अशी फळे पुष्कळ आहेत की, त्यांत केवळ पक्व अण्डाशयच असतो, असे नाही, तर फुलांतील पहिले वर्तुळ अथवां पुष्पधार किंवा इतर भाग मिळून व्यावहारिक फळ तयार होते. अथवा कधी फुलांचे मोहोर, उपपुष्पपत्रे, पुष्पदांडी वगैरेचा फळामध्ये समावेश केला जातो. अशा फळास खरी ( True ) फळे न म्हणतां भ्रामक (Spurious ) फळे समजणे योग्य दिसते. नास्पाती, स्ट्राबे, सफरचंद, अननस, स्ट्राबेरी, फणस, तुती, अंजीर, वगैरे फळे खरी नसून भ्रामक आहेत. त्यांचे वर्णन पुढे करण्यात येईल.