पान:वनस्पतिविचार.pdf/212

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

-ह्याच प्रकारची रचना आढळते. कधीं प्रथम नियमित व पुढे अनियमित

अथवा कधी दोन्हीचे जागजागी थोडे थोडे मिश्रण होते.

 एकंदरीत फुले उपपुष्पपत्राप्रमाणे त्यांचे पोटीं येऊन फुलांची मांडणी वेगवेगळी तयार होते. ज्या वनस्पतींत ज्या प्रकारच्या फांद्या आढळतात, त्याप्रमाणे त्या वनस्पतींच्या मोहरामध्ये तीच व्यवस्था आढळते. म्हणून पूर्वी आम्हीं जें-फांद्या, पाने, उपपुष्पपत्रे व मोहोर ह्यांचा परस्पर निकट संबंध असतो, असे म्हटलें, ते खोटे नाही. समोरासमोर (Opposite ) पाने असली तर फांद्या समोरासमोर असून मोहोरही नियमित प्रकारची असतो. अथवा वर्तुलाकृति ( Whorled) पानांचे ठिकाणी बहुतकरून बहुपाद (Poly chassium ) मोहोर आढळतो. एक झाल्यावर एक ( Alternate ) पाने असतांना फांद्या व मोहोर अनियमित आढळतात.

 क्षुद्र वर्गात ज्या फांदीवर जननपेशी (Spores ) उत्पन्न होतात, त्या फांदीसच मोहोर म्हटले पाहिजे. क्षुद्रवर्गातही एका विशिष्ट ठिकाणीच जननपेशी (Spore ) उत्पन्न होतात, सार्वत्रिक होत नसतात, हे विशेष लक्ष्यांत ठेविण्यासारखे आहे. जननपेशीदलें ( Sporophylls ) उच्चवर्गाप्रमाणे क्षुद्र वर्गांतही आढळतात. बहुतेक त्यांचा आकार पानासारखाच असतो. उच्च वर्गात ही दलें एकवटल्यामुळे त्यास आपण फूल असे समजतो. पण क्षुद्रवर्गात जेथे जेथे म्हणून जननपेशी आढळतात, त्या भागासचे फूल ही संज्ञा लावणे योग्य आहे. कारण फुले म्हणजे जननेंद्रियें; मग ती पुरुषव्यंजक असोत अगर स्त्रीव्यंजक असोत.

---------------
प्रकरण २२ वें.
---------------
फळ.
---------------

 व्याख्या: –गर्भधारणा पूर्ण होताच अण्डाशयांत हळूहळू निरनिराळे फरक होऊ लागतात. गर्भधारणेमुळे हें फरक होण्यास एकप्रकारचे उत्तेजन मिळते. वास्तविक हे फरक गर्भधारणा घडवून आणण्यास कारणीभूत