पान:वनस्पतिविचार.pdf/209

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१ वे ].   उपपुष्पपत्रे (Bracts) व मोहोर (Inflorescence).   १८१
-----

अगर मका यांमध्ये फुलें केवळ पुंकेसर (Staminate ) अगर केवळ स्त्रीकेसर (Pistillate ) असतात. मुख्य पुष्पदांडीवर फुले येऊन ती भाराने लवू लागते. सुपारी, ताड, नारळ, केळी, अळू, घुंयां, सुरण वगैरेमध्ये मुख्य पुष्पदांडी जाड व मोठ्या उपपुष्पपत्रां (Spathe ) तून बाहेर पडून येथे वरीलप्रमाणेच केवळ एकलिंगीफुले असतात. गहू, जव, बाजरी वगैरेमध्येंसृद्धां फुलांस देठ असत नाहींत. फुलें उपपुष्पपत्रांनी वेष्टित असून ती मुख्य दांडीस चिकटलेली असतात.

 झेंडू, सूर्यकमळ, करडे, झिनिया, वगैरेमध्ये फुले एका पुष्पाधारावर असून ती सर्व मिळून एक फूल असावे असे वाटते. उपपुष्पपत्रे ( Bract ) खाली परस्पर चिकटून त्यास पेल्यासारखा आकार येतो. ह्या उपपुष्पपत्रास(Bracts पुष्पकोश ( Calyx ) समजण्याचा संभव आहे. पण हा समज चुकीचा आहे. येथे सांकळ्या पूर्णावस्थेस पोहोंचल्या नसून त्यांचे दोन केसाळ पुंजके व्यक्तिमात्र फुलावर आढळतात. पाकळ्या व इतर वर्तुळे प्रत्येक फुलांत असतात, ह्या प्रकारास गुच्छ ( Capitulum ) असे म्हणतात. हे गुच्छ पसरट व रुंद असतात. जसे-सूर्यकमळ. कधी ते वाटोळे होऊन त्यास चेंडूसारखा आकार येतो. जसे-कदंब, बाभूळ, शमी, लाजवंती, वगैरे.

 अंजीर, उंबर, पिंपळ, वड, नांद्रुक वगैरेमध्ये ज्यास आपण फळ समजतो, ते वास्तविक तसे नुसून फुलाचा एक विशिष्ट प्रकारचा मोहोर आहे. कच्चे अंजीर आडवे कापून पाहिले असतां आंत शेकडों फुले दृष्टीस पडतील. हीं अपूर्ण फुलें केवळ स्त्रीकेसर ( Pistillate) अगर केवळ पुंकेसर (Staminate) असतात. चोहोंबाजूंनी खालील पुष्पाधार वाढून ती सर्व फुले एकेजागी जमून त्याचा एक वाटोळा गोळा बनतो. आंतील फुलांची गर्भधारणा घडवून आणण्यास एक प्रकारच्या माशा उपयोगी पडतात. अग्राकडून माशी आंत घुसून फुलांतील बीजाण्डांत आपली अंडी घालते, त्यामुळे फळ पिकलें म्हणजे आंत शेंकडों लहान लहान किडे उत्पन्न होतात. माशा परागकण एकांतून दुसरीकडे पोहोंचवितात, पुष्पाधार फळ पिकलें म्हणजे मांसल होऊन त्यांत गोड रुची उत्पन्न होते. फळांत बारीक खरीं बीजें ही असतात. ही बीजें मात्र स्त्रीपुरुषतत्व-संयोग होऊन उत्पन्न होतात.