पान:वनस्पतिविचार.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१७२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

गर्भधारण झाल्याबरोबर गर्भाची वाढ होण्यास सुरुवात होते. पहिली गोष्ट म्हणजे आतापर्यंत गर्भाण्डावर नसलेली पेशीभित्तिका उत्पन्न होते. साध्या पेशीस भित्तिका असतात, पण गर्भकोशांतील ( Embryo-sac ) तसेच परागकण नळीमध्ये असणाऱ्या जनन-पेशीस भित्तिका नसतात. जेव्हां स्त्रीतत्त्व व पुरुषतत्त्व-केंद्राच्या मिलाफ होतो, त्यावेळेस तीं परस्पर एकजीव होतात. भित्तिका जर जनन-पेशीवर असती, तर मिलाफ होण्यास अडचण पडती, म्हणूनच ही नैसर्गिक व्यवस्था गर्भक्रिया सुलभ-रीतीने घडवून आणण्यास जास्त उपयोगी पडते. पेशीचे विभाग होणे हे आंतील सर्व चैतन्यशक्तीवर अवलंबून असते. आतां ती पेशी गर्भाण्ड केवळ न राहतां गर्भ अगर बीज-स्थितित पोहोचली असते. तो गर्भ द्विधा होऊन त्याचे दोन भाग होतात. त्या दोन्ही भागांचे पुनः दोन दोन विभाग होतात, म्हणजे त्याचे भाग चार होतात. आठ आठाचे सोळा या प्रमाणे नवीन नवीन पेशी तयार होत जातात. प्रथम द्विधा झालेल्या भागांपैकी खालील भाग जास्त मोठा होत असतो, व वरील भाग लांबट वाढतो. या रीतीने गर्भाची वाढ होत असतां मध्य भागीं असणारे पोषक केंद्रही द्विधा होत असते. विभाग होत होतां पुष्कळ पेशी उत्पन्न होऊन त्या पोषक अन्नांनी भरत असतात. वाढत्या गर्भाकरितां पोषक अन्नाचा सांठासुद्धा प्राथमिकस्थितीत तयार असतो.

 बीजदलें ( Cotyledons ) आदिमूळ ( Radicle ) प्रथम खोड (Plumule ) हीं खालील वाटोळ्या पेशीसमुच्चयापासून तयार होतात. वरील पेशींपासून आदिमुळांचा काही भाग तयार होतो, जसे अग्र.

 ही गर्भाची वाढ द्विदल-धान्य-वनस्पतींत आढळते; पण एकदल-धान्य वनस्पतींत वरील लांबट पेशीसमुच्चयापासून गर्भाचा बहुतेक भाग तयार होऊन खालील पेशीसमुच्चयापासून एकच पण मोठे बीजदल बनते. आदिमूल व प्रथम खोड हीं एका बाजूकडे असतात. प्रत्येक गर्भाभोंवती मग तो गर्भ एकदल वनस्पतीपैकी असो अगर द्विदल वर्गापैकी असो, तथापि हा प्राथमिक अन्नाचा सांठा असतोच, द्विदलगर्भांतील पण पुष्कळ बीजांत तो अन्नाचा सांठा बाहेर न राहतां आंत शोषिला जाऊन गर्भामध्ये समाविष्ट होतो. गर्भाची दले मोठी वाढून सात्त्विक अन्नामुळे ती फुगतात. ह्यांसही अपवाद असतात. जसे,