पान:वनस्पतिविचार.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२० वे ].    बीजाण्ड व गर्भधारणा.    १७१
-----

ओवा, सोपा, जिरे वगैरेमध्ये अण्डे दोन असतात. कापूस, वांगे, पेरू, टोमॅटो, मिरच्या वगैरे फुलांत ती पुष्कळ असतात. जितक्या अण्डास परागकण मिळतात, तितकीच बीजे होतात. पुष्कळ परागकण वाया जाण्याचा संभव असतो, म्हणून त्यांची संख्या अधिक करण्याची नैसर्गिक तजवीज असते.

 जेव्हां अण्डाशयांत एकच अण्ड असते तेव्हां ते बुडास चिकटून सरळ उभे असते. जेव्हां ती दोन असतात त्यावेळेस ती परस्पर संलग्न होतात. पण अधिक संख्या असतांना, नाळेच्या कमी अधिक जाडीवर तसेच अण्डाशयाच्या लहान मोठ्या पोकळीवर त्यांची रचना पुष्कळ अंशी अवलंबून असते. मोहरी, वाल, अळसुंदी वाटाणे वगैरेमध्ये अण्डाशय दीर्घ असल्यामुळे अण्डे एकाजागी गर्दी न करितां वेगवेगळी राहतात. अण्डाशय लहान असून त्यांची संख्या पुष्कळ असेल तर ती परस्पर खेचून राहतात. आता आपण गर्भधारणेकडे वळू.

 गर्भधारणा:-परागकण परागवाहिनीवर पडल्यावर आंत वाढू लागतो, व त्याची एक लांब नळी बनते. ही नळी परागवाहिनींतून अण्डाशयांत शिरते व तेथून मार्ग शोधीत बीजाण्डापाशी येते, अण्डावरील रंध्र ह्यावेळी आयते उपयोगी पडून त्यांतून ती नळी घुसत गर्भकोशांत (embryose) शिरते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे गर्भकोशांत मुख्यकेंद्राचे आठ भाग होऊन तीन अग्राकडे, तीन बुडाकडे व दोन मध्यभागी जातात. पैकी मध्यभागी दोन्हींचे एकच द्वितीयक केंद्र बनले, व खालील केंद्रे गर्भक्रियेस उपयोगी नसून वरील उरलेल्या तिन्ही पैकी एक गर्भाण्ड म्हणून जे असते, तेच मुख्य पुरुष-तत्त्वांशी मिळणारे केंद्र आहे. परागनळीत असणाऱ्या पुंतत्व केंद्राचे दोन भाग होऊन एक भाग वरील दोन केंद्रांतून गर्भाण्डाकडे जातो. त्या दोन केंद्रांत कांहीं आकर्षण द्रव्य असल्यामुळे त्यांतून ते पुंतत्त्वकेंद्र प्रथम शिरून नंतर गर्भाण्डाशी भिडते. गर्भाण्डात, तयार असणारे स्वीतत्त्वकेंद्र हे नवीन आलेले पुरुषतत्त्वकेंद्र ह्या दोन्हींचा एक मिलाफ होऊन दोन्ही एकजीव होतात. ह्या क्रियेस गर्भधारणा ( Fertilisation ) असे म्हणतात. पुंतत्व केंद्राचा दुसरा भाग खाली सरकत द्वितीयक केंद्राकडे (Secondary nucleus ) येऊन त्याशी मिलाफ पावतो. म्हणजे ह्या ठिकाणी तीन केंद्रांचे एकीकरण होते. ह्या एकीकृत केंद्रापासून पुढे पोषक द्रव्य उत्पन्न होते. ह्या द्रव्यावर गर्भ वाढू लागतो.