पान:वनस्पतिविचार.pdf/193

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१९ वे ].    पुंकोश व स्त्रीकोश.    १६५
-----

ती परस्पर संयुक्त असतात, कापूस, भेंडी, एरंडा, आवळा, लिंबू, संत्र, वगैरेमध्यें तीं दलें दोहोंहून अधिक आढळतात. हिरवा चाफां, गुलाब, अशोक वगैरेमध्ये ही दले अधिक असून, सुटी असतात. म्हणून जेव्हा स्त्रीकेसरदल एकच असते अथवा पुष्कळ दले असून सर्व सुटी असतात, त्यावेळी अण्डाशय साधा समजतात; पण जेव्हां पुष्कळ स्त्रीकेसरदले असून संयुक्त असतात त्यावेळी, तो संयुक्त होतो. जसे-महाळुंग, काकडी वगैरे.

 जेव्हां अण्डाशय एकदली असतो तेव्हां त्यास दोन बाज असतात. म्हणजे एक पोटाकडील बाजू व दुसरी पाठीकडील बाजू. जिकेडे स्त्रीकेसरदलाची मध्यशिर असते, ती पाठीकडील बाजू होते व जेथे त्या दलाचे किनारे एकजागी मिळतात, त्यास पोटाकडील बाजू म्हणतात. बीजाण्डे नेहमीं पोटाकडील बाजूसच आढळतात. जसे-वाटाणे, अळसुंदी, उडीद, वगैरे.

 एकदली अण्डाशयांत बीजाण्ड एकच असते असे नाही. नेहमी एकापेक्षा अधिक बीजाण्डे असून त्यांपैकी कांहीं बीजस्थित पावतात व कांही नाहीशी होतात. बीजस्थिति पावण्यास परागकणांची जरूरी असल्यामुळे, जेवढ्यांचा परागकणांशी संयोग होतो, तेवढीं बीजस्थितीस पोहोंचतात.

 स्त्रीकेसरदलांचा बुडी जरी संयोग झाला असला, तथापि त्यावरील पराग वाहिन्या परस्पर संलग्न असतात असे नाही. जसे, सताप वगैरे. जासवंदीमध्ये त्यांची अग्रे सुटी असून खालील दलें परस्पर संयुक्त असतात, तुळसीच्या वर्गात वर, परागवाहिनी ( Style ) संयुक्त असुन खाली दलें वेगळी असतात. कांहीं ठिकाणी खाली दलें सुटी असून अग्रेही सुटी असतात; पण मध्यभागीं संयोग होतो. जसे, भोंकर, गोंन्नि वगैरे. साधारणपणे दलें संयुक्त असून वर परागवाहिन्या संयुक्त असोत अगर नसोत, तथापि त्या अण्डाशयास संयुक्त म्हणण्यास हरकत नाहीं.

 ज्याप्रमाणे एका स्त्रीकेसरदलांत एकच बीज असावे असा नियम नाहीं, त्याचप्रमाणे एका अण्डाशयास एकच खण अगर कप्पा असावा असाही नियम नाहीं. बाभुळीमध्ये स्त्रीकेसरदल एकच असते, पण फळ पाहिले असता त्यामध्ये पुष्कळ खण आढळतात. बाहव्यामध्ये अशाच प्रकारचा एकदल अण्डाशय असून पुढे त्याचे विभाग पुष्कळ होतात. दलाच्या बाजूपासून, फळ वाढत असतांना पडदे निघून पुष्कळ खण अगर विभाग उत्पन्न होतात.