पान:वनस्पतिविचार.pdf/190

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१६२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

 पिटिकेवर एकदांच दृष्टीस पडते. खांचेची उलटी बाजू ही पिटिकेची मागील बाजू असे म्हणता येईल. कारण त्या बाजूत पिटिकेशीं केसराचा संबंध असतो. व खांचेकडील बाजूस तोंड म्हणता येईल. कांहीं फुलांत हे तोंड फुलांचे आतील बाजूस वळले असते. जसे, पाणकमळे, द्राक्षे, वगैरे. कांहीं फुलांत हे झाड बाहेर वळते, जसे, नाकदवणा, तरवार वगैरे.

 वाटोळे, लांबट, रुंद, आंत बाहेर आलेले, तीरासारखे, काळिजासारखे, असे निरनिराळे आकार, पिटिकेंत आढळतात. केसराप्रमाणे पिटिकेसही उपांगे असतात. परागपिटिका दांडीशी कांहीं विशिष्ट प्रकारे जुड़ली असते. केसराचा संयोग परागपिटिकेच्या बुडाशी असतो. जसे, वांगे वगैरे. अथवा सरळ वाढून परागपिटिकेचे दोन्ही कण त्यास सारखे चिकटतात. केसर अशा ठिकाणी पिटिकेच्या कण्यांतून वाढतो, जसे, धोत्रा वगैरे. कांहीं ठिकाणी पिटिकेच्या एका बाजूशी त्याचा संबंध होऊन पिटिका इकडे तिकडे हालत राहते. तृण जातींत अशा प्रकारची पिटिका आढळते.

 योग्य ऋतु प्राप्त झाला म्हणजे परागपिटिका आपोआप फुटून परागकण बाहेर पडतात. पिटिका फुटण्याची जागा म्हणजे ज्या ठिकाणी खांच असते ती होय. तेथे ती जागा प्रथम फुटून खांचेचे भाग मागे वळतात. म्हणजे आपोआप आंत असलेले मोकळे कण बाहेर पडतात. काही ठिकाणी ही परागपिटिका फुटण्याची तऱ्हा सरळ व उभी असते. जसे, द्राक्षे, धोत्रा, वगैरे कधी पिटिका उभी न फुटतां आडवी फुटते. जसे, कापूस, भेंडी, जासवंदी, अंबाडी वगैरे, तंबाखु, मिरची, वगैरे परागपिटिकेंत जागजागी भोंके पडून त्यांतून परागकण बाहेर गळतात.

 केसर संयुक्त जरी असले, तथापि परागपिटिका स्वतंत्र असतात, अथवा केसरावर उपकेसर येऊन त्यावर पिटिका येतात, म्हणजे त्यांच्या संयोगाबरोबर परागपिटिकेचाही संयोग असावा असे नाही. झेंडू, सूर्यकमळ, कॉसमॉस, शेवंती वगैरे फुलांत परागपिटिका परस्पर संलग्न होऊन त्यांची एक नळी बनून त्यांतून परागवाहिनी ( Snync ) बाहेर पडते. पण चमत्कार असा असतो की, बुड़ाकडे ते सुटे असतात. व टोकाकडे पिटिकेचा संयोग होत असतो.