पान:वनस्पतिविचार.pdf/189

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१९ वे ].    पुंकोश व स्त्रीकोश.    १६१
-----

पुंकेसर फूल बनते. म्हणजे पानशेटियाचे फुलांत केवलपुंकेसर, तसेच केवलस्त्रीकेसर फुले आढळतात. प्रथमदर्शनी पानशेटियाचे फूल हे पूर्ण आहे, असे वाटण्याचा संभव आहे; पण उघडून पाहिले असतां फुलाची खरी स्थिति तेव्हांच कळून येते.

 केसर संयुक्त अथवा सुटे असतात. कापूस, अंबाडी, जासवंद, वगैरे फुलांत ते संयुक्त होऊन त्यांची नळी होते. लिंबू, चकोत्रा, महाळूंग वगैरे फुलांत केसर पुष्कळ असून तीन किंवा चार संयुक्त होऊन त्यांचे वेगवेगळे गठ्ठे बनतात. आगस्ता, पावटा, तर वगैरे फुलांत त्यांची संख्या दहा असून पैकी नऊ संयुक्त होतात, व एक सुटा राहतो. शेवरी अगर शेमल (Bombax) फुलांत चकोत्र्याप्रमाणे त्यांचे पांच गठ्ठे होतात, शिवाय हे पांचही गठ्ठे बुडाशी परस्पर चिकटलेले असतात.

 सर्व फुलांत केसरांची लांबी सारखी असते, असें नाहीं. मोहरी, शिरस वगैरेमध्ये ते सहा असून, चार लांब व दोन आखूड असतात. भोंवरीचे फुलांत ते पांच असतात खरे; परंतु चारींचीच वाढ चांगली होते व एक अपूर्ण दशेंत असतो. तुळस, दवणा, केश वगैरे फुलांत दोन केसर लहान व दोन दीर्घ आंब्याचे असतात. फुलांत एकाच केसराची पूर्ण वाढ होते.

 गर्भधारणा झाल्यावर इतर दलाप्रमाणे पुंकेसराचेही काम नसते. ते आपोआप वाळून गळतात. कंपॅॅन्युला नांवाचे फुलांत मात्र अण्डाशयास चिकटून एखादा केसर रहातो.

 परागपिटिका म्हणजे पुरुषतत्व पेटारा आहे. त्यास साधारणपणे चार खाने अगर कप्पे असतात, व ह्या सणांत सुटे परागकण असतात. ही पिटिका मुख्य दोन खणाची असून प्रत्येक खणांत दोन लहान खण असतात. केसराचा भाग सरळ पिटिकेमध्ये वाढल्यामुळे तिचे दोन खण तयार होतात. पुष्कळ वेळां हें लहान खाने पूर्ण होत नाहीत. कारण मध्य पडदा पूर्ण वाढून दुसऱ्या बाजूला टेकला नसतो. अशा वेळेस ह्या लहान खणांचा परस्पर संबंध राहतो. कापूस, भेंडी, शेमल वगैरे फुलांत परागपिटिका एकखणी असते. पिटिकेंतील फरकामुळे त्यांसारख्या इतर वनस्पतींचे त्यापासून वर्गीकरण करितां येते.