पान:वनस्पतिविचार.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१८ वे ].   पुष्पबाह्य वर्तुळे (पुष्पकोश Calyx पुष्पमुगुट Corolla).   १५९
-----



 कमी अधिक पाकळ्यांच्या वाढीप्रमाणे पांकळ्यांंसही कधी कधी उपपाकळ्या येतात. कृष्णकमले फुलांत पांकळ्या झाल्यावर आतील बाजूस पांकळ्यांंसारखी उपांगे येतात. त्यामुळे फुलांस विशेष शोभा येते. कांहीं फुलांत एक पाकळी जास्त वाढून नागाच्या फणाप्रमाणे दिसते. खालील बाजूस इतर पांकळ्या एकमेकांस चिकटलेल्या असतात. कांहीं फुलांत देंठ व पाकळीचा रुंद भाग जेथे चिकटला असतो, तेथे केंसासारखे भाग येतात. जस कण्हेर वगैरे.

 सांकळ्याप्रमाणे पांकळ्यासुद्धां गर्भधारणक्रिया घडल्यावर सुकून गळू लागतात. द्राक्षामध्ये फूल उमलले असतां लागलीच पाकळ्या गळून जातात. कायम टिकणाऱ्या पाकळ्या फार क्वचित् आढळतात.

 असो; याप्रकारचे फुलांतील बाह्यसंरक्षक वर्तुळांचे वर्णन संपले. यापुढे पुंकेसर व स्त्रीकेसरभागाचा विचार व्हावयाचा आहे. पुंकेसर दलांत पुरुषतत्त्व असून ते स्त्रीकेसरतत्वाशीं मिलाफ पावले असता, त्यापासून बीज अगर मुग्ध दशेंत असणारा रोपा तयार होतो. बीज तयार करणे हे फुलांचे मुख्य कर्तव्य असून ते साधण्याकरितां त्यास योग्य ते आकार येतात. बीजापासून वनस्पतींची परंपरा कायम राहते. केवलपुंकेसर फुलांपासून बीज तयार होत नाहीं. बीज उत्पन्न होण्यास अवश्य स्त्रीकेसर फूल पाहिजे. केवल-पुंकेसर फुलांतील परागकण केवल स्त्रीकेसर फुलांस उपयोगी पडतात. ते परागकण किड्याच्या साहाय्याने अथवा फुल- पांखराचे पंखास चिकटल्यामुळे स्त्रीकेसर फुलांस पोहोंचविले जातात. तसेच वारा वाहू लागला असतां परागकण उडून जेथे जरूर असेल तेथे आपोआप उपयोगी पडतात. पाण्यांचे कांठी उगवलेल्या वनस्पतीमध्ये सुद्धां परागकण, पाण्यात पडून प्रवाहाबरोबर वाहून केवल-स्त्रीकेसर फुलांस मिळतात. केवल स्त्रीकेसर फुले ऋतुकाली पुरुष तत्त्वाची वाट पाहत असतात. योग्य संधी आली की, गर्भधारणा पूर्ण होते. पाकळ्यांचे सुंदर रंग, आंतील मधोत्पादक पिंड, तसेच त्यांचा सुवास, वगैरे गोष्टीही अप्रत्यक्ष मदत गर्भधारणा घडवून आणण्यास आपआपल्यापरी देत असतात. खरोखर ह्या सर्व गोष्टीचे बारीक निरीक्षण केलें म्हणजे प्रत्येक जीवनमात्रासंबंधी त्यास अवश्य लागणाऱ्या वस्तूंची तजवीज व त्यांत दाखविलेले अगाध चातुर्य, ह्यांचे कौतुक करावे तितकें थोडेच आहे.

---------------